
रोहित पवारांची पोलीस ठाण्यातच अधिकाऱ्यांना दमबाजी…
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात बुधवारी शाब्दिक चकमक झाली.
त्यानंतर आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यात विधिमंडळ लॉबीत जोरदार हाणामारी झाली. यानंतर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात ठिय्या मारला. दरम्यान, आमदार रोहित पवार यांचा पोलिस स्थानकात अधिकाऱ्यांना दमबाजी करत असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
”आवाज खाली…बोलता येत असेल तर बोलायचे..बाहेर जा तुम्ही”, असे रोहित पवार पोलिसांना रागाने म्हणत असल्याचे व्हिडिओत दिसते. यावेळी पोलिस स्थानकात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती.
सांगलीतील ‘न्यू आका इन मेकिंग’ला कंट्रोलमध्ये ठेवा- रोहित पवार
दरम्यान, विधिमंडळ परिसरात झालेल्या मारहाणीच्या घटनेवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”काल आपण जर पाहिले तर लोकांनी निवडून दिलेले आमदार विधानभवनात येतात. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळतो. मात्र सत्तेतील लोकांना कुठेही कायदा हातात घेता येऊ शकतो? असे दाखवनू दिले. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना बाहेर थांबवले गेले. मात्र तरीही ते आत आले. आव्हाड यांना आलेली धमकी अध्यक्षांना सांगूनसुद्धा असे प्रकार घडत आहेत. गांजा विकणारा माणूस घेऊन भाजपचे आमदार विधानभवनमध्ये येतात. सांगलीमध्ये एक आका तयार झाला आहे. ‘न्यू आका इन मेकिंग’ला सरकारने कंट्रोल करावे”, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठ्या मनांचे असते तर पवार साहेबांवर टीका करणाऱ्यांना जाब विचारला असता. मात्र तसे नाही. नितीन देशमुख यांना रात्री भेटलो. त्यांना जे जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. आज त्यांना जामीन मिळेल, असेही पवार म्हणाले.
गोपीचंद पडळकर यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, हे मास्टरमाईंड आहेत. नवीन आका समोर आलाय.
अधिवेशनात गुंड आणले गेले आहे, हे अतिशय घातक असल्याचे त्यांनी नमूद केले.