
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं होतं. मात्र, या निवडणुकीत इव्हीएम मशीनवर अनेक प्रश्न उपस्थित करत मतांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केला होता.
त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणच्या मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवारांनी फेरमतदानाची मागणी केली होती.आता या विषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
महाविकास आघाडीच्या 105 उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. या मागणीला निडणूक आयाोगाने प्रतिसाद दिला आहे. मूळ मतमोजणी न करता मॉक पोलद्वारे मतदान मोजण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. याविरोधात काही उमेदवारांनी थेट सुप्रिम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. त्यानुसार आता ही मागणी मान्य करण्यात आली असून फेर मतदानमोजणी होणार आहे.
२५ जुलैपासून सुरूवात
हडपसर विधानसभा मतदार संघातून आघाडीचे उमेदवार म्हणून प्रशांत जगताप यांनी निवडणूक लढविली होती. आक्षेप घेतलेल्या उमेदवारांमध्ये त्यांचेही नाव होते. त्यानुसार 25 जुलैपासून हडपसर विधानसभा मतदारसंघातील ज्या 27 मशीन बाबत आक्षेप नोंदवला आहे. त्याची मतमोजणी होणार आहे. त्यानुसार ईव्हीएम मधील मतदान आणि व्हीव्हीपॅट मोजले जाणार आहेत. आठ दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या फेरमतमोजणीची सुरूवात हडपसर विधानसभा मतदारसंघातून हळूहळू आक्षेप नोंदविण्यात आलेल्या मतदार संघात होणार आहे.
…पण ईव्हीएममुळे ते आपल्यापर्यंत पोहचलं नसल्याचा आरोप
शरद पवार गटाचे माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार उत्तम जानकर यांनी सर्वप्रथम मरकडवाडी गावात आपल्याला लोकांनी मतदान केलं पण ईव्हीएममुळे ते आपल्यापर्यंत पोहचलं नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राज्यात हा मतदार संघ चर्चेत आला होता. त्यानंतर या गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. यामुळे राज्यात मोठा वादंग निर्माण झाला होता.