
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते संजय राऊत रोज नवे मुद्दे घेऊन माध्यमांसमोर येऊन बॉम्ब फोडतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही.
अलीकडे त्यांनी मोदी यांच्या निवृत्तीवर भाष्य करणे सुरू केले आहे. याचा खरपूस समाचार भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज घेतला.
मोदी यांनी सर्व विरोधकांचे दुकाने बंद केली आहेत. त्यामुळे राऊत यांचा त्यांच्यावर राग आहे. त्यांनी बोलणे जरी बंद केले असते तरी उद्धव ठाकरे यांच्या जागा वाढल्या असता असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.
‘संजय राऊत यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचे, हे सर्वांना माहिती आहे. त्यांच्या अनावश्यक बोलण्याने उद्धव ठाकरे यांच्या जागा कमी झाल्या आहेत. मोदी यांना 2029 पर्यंत जनमत मिळाले आहे. त्यामुळे त्यामुळे संजय राऊत यांनीच आता कोणाला नेता मानायचे हे ठरवावे. भाजप आणि आमच्या राष्ट्रीय नेतृत्वामध्ये लुडबूड करण्याचा राऊतांना अधिकार नाही. मोदी समर्थ आहेत. सक्षम आहेत. केव्हा निवृत्ती घ्यावी हे त्यांना कळते. यापूर्वी अनेक नेत्यांनी 80 ते 82व्या वर्षांपर्यंत काम केले आहे’, याकडे मंत्री बावनकुळे यांनी लक्ष वेधले.
हनी ट्रॅप’ आणि ‘पेन ड्राईव्ह’ या सर्व शिळ्या भाकऱ्या आहेत. मीडियामध्ये आपला अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ते वाढवून, चढवून बोलतात. पाच वर्षांपूर्वीचे ते बोलतात. सध्या 2025 सुरू आहेत. विरोधकांकडे दुसरे काहीच मुद्दे नाहीत. महाविकास आघाडीत (MVA) प्रचंड वाद आहेत. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीसुद्धा त्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला होती. ते एकत्र पत्रकार परिषद घेऊ शकले असते. यावेळीसुद्धा ते एकत्र दिसले नाहीत’, असा टोला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
विरोधकांमध्ये समन्वय नाही आणि विरोधी पक्षनेता निवडण्याची मागणी करीत आहेत. ते आपसातच यासाठी भांडत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपली उंची पाहून आरोप केले पाहिजे, असा सल्ला मंत्री बावनकुळे यांनी दिली.
मंत्री गिरीश महाजन यांच्यावर वैयक्तिक आरोप करून त्यांच्या जीवनाबद्दल संशय निर्माण करणे योग्य नाही. खडसे यांनी वैयक्तिक हेवेदावे आणि राजकारण सोडावे. लोढा याचे फोटो सर्वच पक्षातील नेत्यासोबत आहेत. शेजारी उभा राहून कोणी फोटो काढला म्हणजे नेता दोषी होऊ शकत नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले.