
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरमधील खासदार नीलेश लंके पावसाळी संसदीय अधिवेशनानिमित्ताने दिल्लीत आहेत. त्यांनी तिथूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसानिमित्ताने फोन करत, शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री अजितदादा अन् खासदार लंके यांच्यात फोनवर नेमकी काय चर्चा झाली हे कळू शकलं नाही. खासदार लंके यांनी मात्र आपण फोन केल्याचे सांगितलं.
लोकसभा निवडणुकीपूर्वी अजितदादांची साथ सोडून शरद पवार यांच्याकडे येत नीलेश लंके यांनी खासदारकी लढवली. साथ सोडल्याने लंकेंवर अजितदादा नाराज झाले होते. पण आता पुलाखालून बरचं पाणी वाहून गेलं आहे. त्यामुळे खासदार लंकेंनी अजितदादांच्या वाढदिवसानिमित्ताने दिल्लीतून फोन केला असला, तरी त्याची चर्चा अहिल्यानगरमध्ये रंगली आहे.
खासदार नीलेश लंके म्हणाले, “राजकारण आणि समाजकारण यात अंतर असते. राजकारण हा वेगळा भाग असतो. व्यक्तिगत जीवनात हितसंबंध जपणे हा वेगळा भाग आहे. विरोधात कोणी कोणाला शुभेच्छा द्यावा नाही काय? आदरणीय शरद पवारसाहेबांना (Sharad Pawar)वाढदिवसाला प्रफुल्ल पटेल अन् अजितदादा सर्वात अगोदर पोचले होते. आज अजितदादांचा वाढदिवस आहे, मग मी शुभेच्छा देणारच ना!
अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. आम्ही राजकारण आणि समाजकारण एकत्र केलेली माणसं आहोत. शुभेच्छा देणं अन् राजकारण यात वेगळं अंतर आहे. आम्ही पवारसाहेबांच्या निष्ठेला बांधलेले आहेत. पवारसाहेब आमचं दैवत आहे. त्यातून आम्हाला प्रेरणा मिळते. त्यातून आम्ही समाजकारण अन् राजकारण एकत्र केल्याने आम्ही शुभेच्छा देणारच’, असे खासदार नीलेश लंके यांनी म्हटले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. या दोघांच्या वाढदिवसानिमित्ताने खासदार नीलेश लंके यांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. विशेष करून अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने पोस्ट करताना, त्यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अजितदादांनी खासदार लंकेंच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसतो. खासदार लंकेंनी अजितदादांच्या वाढदिवसानिमित्ताने हा फोटो ट्विट करत, सूचक असे संकेत दिल्याची चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी नीलेश लंके यांनी अजितदादांची साथ सोडत, शरद पवार यांच्याकडे आले अन् खासदारकी लढवली. भाजपचे सुजय विखे यांच्याबरोबर झालेल्या सामन्यात लंकेंनी विजय मिळवला. परंतु विधानसभा निवडणुकीत पारनेर मतदारसंघात अजितदादांनी राजकीय परतफेड केली. अजितदादांचे शिलेदार काशिनाथ दाते यांनी खासदार लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव केला.
राणी लंके यांचा हा पराभव खासदार लंके यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 मतदारसंघात, महायुतीने महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडवला. दहा जागांवर विजय मिळवला. महाविकास आघाडीच्या वाट्याला कर्जत-जामखेड आणि श्रीरामपूर मतदारसंघ आले. राज्यात देखील महाविकास आघाडीची पुरती पिछेहाट झाली. शरद पवार यांचे राज्यात विधानसभा निवडणुकीत फक्त दहा आमदार निवडून आले आहेत.