
भाजप प्रवेशानंतर 25 वर्षांचा प्रश्न निकाली !
1.काँग्रेसच्या बंडखोर नेत्या आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत २५ वर्षांपासून रखडलेल्या वसंतदादा स्मारकासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
2.यामुळे जिल्ह्यामध्ये अशी चर्चा सुरू झाली आहे की, जे काम काँग्रेस आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांना जमले नाही, ते जयश्रीताईंनी अल्पावधीतच करून दाखवले आहे.
3.या निधी मंजुरीमुळे वसंतदादा स्मारकाच्या कामाला गती मिळाली आहे आणि जयश्रीताई पाटील यांच्या राजकीय सामर्थ्याची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसच्या नाराज आणि बंडखोर नेत्या मदनभाऊ गटाच्या नेत्या तथा जिल्ह्या बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून दोन महिने होत आहेत. तोच त्यांनी गेल्या 25 वर्षांपासून रखडलेल्या वसंतदादा स्मारकाच्या कामासाठी आठ कोटीचा निधी मंजूर केला आहे. यामुळे काँग्रेसला आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांना जे जमलं नाही ते दोनच महिन्यात जयश्रीताईंनी करून दाखवलं अशी चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राची अस्मिता असून सांगली बस स्थानकाच्या समोर असणारे त्यांचे स्मारक गेल्या 25 वर्षांपासून रखडलेले होते. त्यासाठी जयश्री पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन निधीची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे आता या स्मारकाला आधुनिक सोयींनी युक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ कोटीचा निधी मंजूर केल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच त्यांनी पुढच्या दौऱ्यात त्याचा अद्यादेश मी घेऊन येईन. तोवर स्मारक विकासाचा विस्तृत आराखडा तयार करा. पुढील वर्षाच्या सुरवातीपर्यंत काम पूर्ण व्हावे, असे नियोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. हे काम आता आर्किटेक्चर प्रमोद चौगुले यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
पालकमंत्री पाटील यांनी स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारकाला भेट देऊन पाहणी केली. श्रीमती पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी अशोक काकडे, आयुक्त सत्यम गांधी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सार्वजिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, जनसुराज्यचे समित कदम, बाजार समितीचे संचाल संग्राम पाटील, माजी नगरसेवक संतोष पाटील, उत्तम साखळकर, प्रशांत मुळके, संजय कांबळे, गजानन मगदूम आदी उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ”जयश्रताईंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आणि त्यांनी तात्काळ त्याला मान्यता दिली. हे काम लवकर मार्गी लावत आहोत. अभ्यासिका, कॅन्टीन, दुमजली ग्रंथालय-वाचनालय, कलादालन विकास आदी गोष्टींचा त्यात समावेश असेल. एकदा काम पूर्ण झाले की स्मारक देखभालीसाठी मनपाकडे द्यायचे की वेगळा विचार करायचा, याबाबत निर्णय करता येईल. येथे छोटे कार्यक्रम प्रभावीपणे घेता येतील.” आर्किटेक्चर प्रमोद चौगुले यांच्याशी त्यांनी चर्चा केली. पुण्यातील अलिकडेच झालेल्या नवीन नाट्यगृहांची पाहणी करून अहवाल करण्याच्या सूचना दिल्या. येत्या 14 ऑगस्ट रोजी त्याबाबतचे सादरीकरण केले जाईल. सप्टेंबरमध्ये निविदा काढून जानेवारीत काम पूर्ण होईल, अशा पद्धतीने तयारी ठेवा, अशा सूचना पाटील यांनी दिल्या.
कोणते काम होणार
वसंतदादा स्मारकातील जुने काही काम बाकी आहे. त्यात एक मुख्य डोमचे काम मोठे आहे. शिवाय इलेक्ट्रिकल कामांचा समावेश आहे. सभागृहाचे कामही अपूर्ण आहे. नव्या कामात वसंतदादांची फोटो गॅलरी आणि म्युझियमचा समावेश करण्यात आला आहे.
25 वर्षे काम रखडलेलं
वसंतदादा स्मारकाच्या कामास 2001 मध्ये मंजूर झाले होते. पण गेली 25 वर्षे ते रखडलेलं असून अद्याप पूर्ण झालेले नाही. एक कोटींचे हे मूळ काम होते. पण आता 2014 मध्ये नव्याने काम सुरु झाले आणि आराखडा 8 कोटींचा झाला. आता आणखी 8 कोटी मंजूर झाले आहेत. यामुळे किमान आत्तातरी स्मारकाचे काम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा सांगलीकर करताना दिसत आहेत.