
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण आणि इतर कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याप्रकरणी मराठा आरक्षणाचे आंदोलन मनोज जरांजे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लक्ष्य केलं होतं.
यावरून सुनील तटकरे यांनी बुधवारी (23 जुलै) नवी दिल्लीत मौन सोडलं. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची यंत्रणा राबवावी, सरकारकडे तक्रार करावी, अशी भूमिका सुनील तटकरे यांनी मांडली आहे. पावसाळी अधिवेशनसाठी नवी दिल्लीत गेलेल्या तटकरे यांच्या भूमिकेनंतर आता मनोज जरांगे पाटील काय करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
माणिकराव कोकाटे यांचा ‘रमी’चा डाव व्हायरल झाल्यानंतर सुनील तटकरे यांच्या लातूर दौऱ्यातील पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने तटकरेंच्या टेबलावर पत्ते टाकले. त्यानंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. यानंतर राजकारण ढवळून निघालं आहे. याबाबत सुनील तटकरे यांनी संयम ठेवत बोलणं टाळलं होतं. या घटनेनंतर जरांगे पाटील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. या हल्ल्यामागे सुनील तटकरे तटकरे आहेत, त्यांनीच मारहाण करण्यास सांगितली होती. त्यामुळे तटकरेंवर 307 कलम (हल्ल्याचा कट) लावण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली होती.
त्यावर जरांगे पाटील यांनी तक्रार करावी, त्यांची यंत्रणा कामाला लावावी, माझी हरकत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी आपल्याकडेही व्हिडीओ आहेत, असंही म्हटलं आहे. आपण या संपूर्ण प्रकरणात संयमी भूमिका घेतली होती. छावा संघटनेचं निवेदन उभं राहून स्वीकारली. त्यावेळी ते काय बोलत होते, हेही ऐकलं, असं तटकरे यांनी स्पष्ट केलं.
विधिमंडळ सभागृहातील रमी खेळण्याचे प्रकरण आणि त्यांनंतर सरकार भिकारी असल्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य यावर सुनील तटकरे यांनी कोकाटेंना कानपिचक्या दिल्या आहेत. जबाबदार नेतृत्वानं जबाबदारीनं बोलावं, असे तटकरे यांनी सुनावलं आहे. तसेच विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची केलेल्या मागणीवरही ती विरोधकांची भूमिका असल्याचं म्हटलं आहे. आज अजित पवार मुंबईत आहेत. त्यामुळे माणिकराव कोकाटे अजित पवार यांना भेटू शकतील मात्र, याबाबत आपल्याला माहिती नाही, असे तटकरे यांनी सांगितले. तसेच कोकाटेंबाबत अजित पवार भूमिका घेतील, स्पष्ट केले. मात्र, मी दौऱ्यावर असल्यामुळे कोकाटेंशी बोलणं झालेलं नाही, असंही तटकरे म्हणाले.