
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी -तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण): शालीवाहन नगरी पैठण येथील प्राचीन आणि प्रसिद्ध नागघाटावर श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने नागपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. मंगळवार दिनांक 29 रोजी नागपंचमी निमित्त नागेश्वर दगडी मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
भाविकांनी गोदावरी स्नान करून नागघाटावर दर्शन घेतले. नागेश्वर मूर्तीचा पहिला अभिषेक प्रा. प्रतीक सराफ यांच्या हस्ते झाला. यावेळी पुरोहित जितेंद्र कुलकर्णी व जगदीश कुलकर्णी यांच्या मंत्रघोषात अभिषेक पार पडला. महिलांनी पारंपरिक गीते गात भक्तीमय वातावरण निर्मान केले.
पेशवे गणपती, इंद्रेश्वर महादेव, नागेश्वर पिंडी व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीचे दर्शनही यावेळी घेण्यात आले. मुलांनी बासऱ्या, कागदी पिपाण्या घेऊन आनंद लुटला. काही वृद्धांनी बालशालीवाहन व नागडोल्यांच्या जुन्या परंपरेची आठवण करून दिली.
नागघाटाच्या ऐतिहासिकतेला साजेशी पर्यटनदृष्ट्या सुधारणा व्हाव्यात, अशी मागणी नागघाट भक्त मंडळांनी केली आहे. याशिवाय मामा चौकातील अनंत नाग मूर्तीची पूजा व वाहेगावच्या नागनाथ मंदिरातही उत्सव भक्तीभावाने पार पडला.