करवीर विधानसभा मतदारसंघात दिवंगत माजी आमदार पी. एन. पाटील यांचा गट अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. अखेरपर्यंत काँग्रेसचे निष्ठावंत अशी पी. एन. पाटील यांची ओळख होती.
पण नुकतीच त्यांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख निश्चित झाली. या भेटीदरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ देखील उपस्थित होते.
ज्या पद्धतीने स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख आपले वडील पी.एन. पाटील यांच्या पाठीशी राहिले, त्याच पद्धतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिल्याचे राहुल पाटील यांनी या भेटीनंतर सांगितले. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापूरला भव्य मेळाव्यात पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. करवीर मतदारसंघातील सुमारे 25 हजार कार्यकर्त्यांचा मेळावा अजित पवार यांच्या उपस्थित होणार असल्याची माहिती आहे.
गतवर्षी विधानसभा निवडणुकीत राहुल पाटील यांचा काँग्रेसकडून पराभव झाला. तेव्हापासूनच ते नाराज असल्याचे बोलले जाते. शिवाय भोगावती साखर कारखान्याला सरकारकडून मदत मिळवण्यासाठीही ते सत्ताधारी पक्षात जाण्यास उत्सुक होते. यापूर्वी त्यांची भाजप प्रवेशाची चर्चा होती. पण प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा हिंदुत्ववादी विचारांऐवजी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याबाबत सल्ला देण्यात आला. तिथूनच मंत्री हसन मुश्रीफ यांनी सूत्र हातात घेतली.
काही दिवसांपूर्वी राहुल पाटील यांनी भोगावती कारखान्यावर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. यात मी भोगावती साखर कारखाना आणि कार्यकर्त्यांच्या हितासाठी जो निर्णय घेईन, त्याला सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले. या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद देऊन पाठीशी राहण्याचा निर्णय दिला. तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यासोबत आपण राहणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. तर काही अनुपस्थितांनी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहू, अशी भूमिका घेतल्याचे समजते. याच बैठकीनंतर राहुल पाटील हे मुंबईकडे रवाना झाले.
