दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण) : तालुक्यातील कुरणपिंप्री येथे दोन अल्पवयीन मुलींच्या विवाहाचा प्रयत्न पोलिसांनी आणि महिला व बाल विकास विभागाने वेळीच रोखला.
तालुक्यातील एका महिलेने पैठण पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, तिच्या नातेवाइकाकडून दोन अल्पवयीन मुलींचे विवाह लावण्याची तयारी सुरू होती. संबंधित व्यक्ती या मुलींचा विवाह पैठण तालुक्यातीलच दोन तरुणांशी लावण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली.
तक्रारीनंतर पोलिसांनी आशा सेविका, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामप्रतिनिधींच्या मदतीने संबंधितांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुली व पालकांचे समुपदेशन करण्यात आले. यानंतर बंधपत्र लिहून घेऊन, संबंधितांना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, संभाजीनगर येथे सोमवारी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.