
राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात. सर्वच पक्षांनी आपल्या स्थरावर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष या निवडणुका एकत्र लढणार की वेगवेगळ्या?
याबाबत अद्याप चित्र पुरेस स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र दुसरीकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या महायुती म्हणूनच लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढती देखील होऊ शकतात, मात्र ती अपवादात्मक परिस्थिती असेल, सर्व ठिकाणी आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान जर महायुतीमधील सर्व घटक पक्ष ही निवडणूक एकत्र लढले तर कोणाच्या वाट्याला किती जागा येणार? कोणाचा किती वाटा असणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र हे सर्व घडत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता नवा पेच निर्माण झाला आहे, तो म्हणजे तीन दिवसांपूर्वी शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आज शिवसेना शिंदे गटाच्या सोलापुरातील 11 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
यामध्ये शिवसेना जिल्हा समन्वयक आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी पुढाकार घेत 11 जणांचे राजीनामे पक्षाकडे दिले आहेत. पक्षातील लोकसभा संपर्क प्रमुख संजय साठे यांच्या विरोधात ही सर्व मंडळी आता आक्रमक झाली आहेत. संजय साठे यांनी शिवाजी सावंतांच्या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्याची या पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे. मात्र शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी अद्यापही या प्रकरणाची दखल घेतली नसल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान आज शिवसेनेच्या आकरा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असले तरी आगामी काळात आणखी काही जिल्हाप्रमुख असलेल्या नेत्यांनी राजीनामा दिला तर याचा शिवसेना पक्षाला मोठा फटका बसू शकतो. त्यातच जर हे सर्व पदाधिकारी भाजपच्या गळाला लागले तर मात्र शिवसेना शिंदे गटाला महापालिकेसाठी उमेदवार मिळणे देखील कठीण जाणार आहे. महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषदेला ही अशीच परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे एकनाथ शिंदे ही धुसफूस थांबवण्यात यशस्वी होतील कां हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. शिंदे हे कोडं आता कसं सोडवणार? हे पाहावं लागणार आहे.