
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण) : तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत नवीन गट म्हणून नावारूपाला आलेले नवगाव हे सुमारे 5550 ते 6000 लोकसंख्येचे गाव असून, पुढाऱ्यांचे आणि डॉक्टरांचे गाव म्हणून ओळखले जाते. यामागचे कारण म्हणजे, या गावातील जवळपास प्रत्येक घरात एक पुढारी आढळतो तसेच वैद्यकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तालुक्यात सर्वाधिक आहे.
गावात उर्दू माध्यमातून वर्ग 10वी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून, शासनाकडून सर्व सुविधा पूर्णपणे उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पत्र्यांच्या खोलींमुळे अभ्यासात अडथळा निर्माण होतो, उन्हाळ्यात वर्गात उष्णतेमुळे विद्यार्थी घामाघाम होतात, तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
ही बाब गावकऱ्यांनी वरिष्ठांकडे मांडली असता, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पाटील कापसे यांनी तात्काळ पुढाकार घेत सर्व वर्गांसाठी छताचे पंखे व पाणी शुद्धीकरण यंत्र (आरो मशीन) भेट दिले. यासोबतच भविष्यात शाळेला आणखी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
यापूर्वीही कापसे पाटील यांनी नवगाव गटातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या आहेत. शेत रस्ते, वीज समस्या, गावांतर्गत रस्ते, पथदिवे (हायमास्ट), तसेच शाळांना भौतिक सुविधा पुरविण्याचे अनेक कामे त्यांनी केली आहेत. त्यामुळे त्यांचे नाव पंचक्रोशीमध्ये कौतुकाने घेतले जाते.
स्थानिक नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “ज्या जिल्हा परिषद शाळांनी समाजात आदर्श स्थान निर्माण केले आहे, त्या शाळांना जर भौतिक सुविधांचा अभाव भासत असेल तर प्रत्येकाने पुढाकार घेऊन त्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात, जेणेकरून ‘पुढाऱ्यांचे आणि डॉक्टरांचे गाव’ ही ओळख खऱ्या अर्थाने जपली जाईल.”
या छोटेखानी कार्यक्रमाला गावातील पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.