
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण) : जि.प. प्रशाला मुलांची, पैठण येथे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांप्रती आपले विचार व्यक्त केले. क्रीडा विभाग प्रमुख समशेर पठाण यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा व लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव केला. त्यांनी शाळेच्या क्रिडांगणात 250 झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला असून, त्यांच्या संवर्धनासाठी ड्रीप सिस्टीम व मैदान समतल करण्यासाठी ट्रॅक्टर, लाल माती आदीं साहित्याची मागणी प्रमुख पाहुण्यांसमोर मांडली.
प्रमुख पाहुणे व राज्याचे अर्थ व नियोजन राज्यमंत्री तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल पटेल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “मी देखील या शाळेचा माजी विद्यार्थी असून, याचा मला अभिमान आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी बिकट परिस्थितीवर मात करून मराठी भाषेचा गौरव सात समुद्रापार पोहोचवला. शाळेचा विकास पाहून समाधान वाटले.” त्यांनी तत्काळ ड्रीप सिस्टीम देण्याचे आश्वासन दिले तसेच आवश्यक ती मदत कायम करण्याची ग्वाही दिली.
या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक अंकुश गाडे यांनी भूषवले. या प्रसंगी सभापती मोहम्मद हनीफ, सोसायटी चेअरमन मुस्ताक पठाण, नगरसेवक व काँग्रेस शहराध्यक्ष निमेश पटेल, इम्रान पठाण, ॲड. रयश गव्हाणे, बाबुराव घोडके, एन.सी.सी. प्रमुख ताराचंद हिवराळे, उर्दू विभाग प्रमुख फैयाज शेख आदीं मान्यवर उपस्थित होते.