
परंड्यात मोटेंचं ‘घड्याळ’ पुन्हा वाजणार?
दैनिक चालू वार्ता | उपसंपादक: नवनाथ यादव, धाराशिव
भू म /परंडा (धाराशिव):देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांचे एकेकाळचे निष्ठावान आणि परंडा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आले आहेत. ‘घड्याळ’ चिन्ह बदललं नसून ‘नेतृत्व’ मात्र बदलणार, अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. उपमुख्यामंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.
सूत्रांच्या हवाल्याने समजते की, राहुल मोटे येत्या ५ किंवा ९ ऑगस्टला औपचारिक पक्षप्रवेश करणार असून, त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
*पराभवानंतरही मोटेंचा जनाधार मजबूत*
मागील निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला तरी मोटे यांनी राजकारणातून माघार घेतली नाही. त्यांनी कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद ठेवत गावोगाव संपर्क कायम राखला. त्यामुळेच त्यांचा जनाधार आजही भक्कम असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
*महामंडळ किंवा राज्यमंत्रीपदाची शक्यता!*
या प्रवेशादरम्यान मोटेंना थेट सत्तेत सहभागी करून घेण्याची शक्यता आहे. महामंडळ प्रमुख किंवा राज्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता त्यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त केली जात आहे. सत्तेच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाला गती देण्याचा हेतूही यात असल्याचे सांगितले जात आहे.
*धाराशिव जिल्ह्यात अजित पवार गट मजबूत होणार*
राहुल मोटेंसारखा अनुभवी आणि प्रभावी नेता गटात सामील झाल्यास जिल्ह्यातील संघटनात्मक रचना बळकट होईल. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अजित पवार गट अधिक आक्रमकपणे उतरेल, हे निश्चित आहे.