
कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आणि तेजस्विनी पंडितच्या आई ज्योती चांदेकर पंडित यांचं 16 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर रविवारी 17 ऑगस्ट रोजी पुण्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.
ज्योती चांदेकर यांच्या अंत्यदर्शनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेसुद्धा पोहोचले होते. अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेच आईला मुखाग्नी दिला. त्यांना अखेरचा निरोप देताना ती ढसाढसा रडली. ज्योती यांनी मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. त्यापैकीच एक त्यांची भूमिका म्हणजे ‘सिंधूताई सपकाळ’. याच भूमिकेला अनुसरून तेजस्विनीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून तुम्हीसुद्धा नि:शब्द व्हाल.
या पोस्टमध्ये माई आणि ज्योती चांदेकर यांच्यातील संवाद लिहिला आहे. ज्योती चांदेकर यांना भेटून माई म्हणतात, ‘ज्योती बेटा.. आता तिकडे माईची हुबेहूब भूमिका कोण साकारणार बरं?’ 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटात त्यांनी माईंच्या भूमिकेला योग्य न्याय दिला होती. त्यामुळे ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा फोटो आणि त्यावर लिहिलेला संवाद पाहून नि:शब्द झाल्याची भावना काहींनी व्यक्त केली.
ज्योती चांदेकर यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात एका हिंदी चित्रपटातील छोट्याशा भूमिकेनं झाली होती. अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या ‘एक नजर’ या चित्रपटाचं शूटिंग पाहण्यासाठी त्या वडिलांसोबत गेल्या होत्या. दिग्दर्शकाने दिलेल्या काही ओळी सहजगत्या वाचल्यानंतर ‘या मुलीला मेकअप करण्यासाठी न्या’ असं दिग्दर्शकाने सांगताच त्यांच्या अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. त्यांनी ‘सुंदर मी होणार’, ‘करायला गेलो एक’, ‘वऱ्हाडी माणसं’, ‘स्वयंसिद्धा’ यांसारख्या नाटकांमध्येही काम केलंय.
‘मित्र’ या नाटकामध्ये त्यांनी डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत साकारलेली भूमिका लक्षणीय ठरली होती. ज्योती चांदेकर यांनी ‘मी सिंधूताई सपकाळ’, ‘पाऊलवाट’, ‘सुखान्त’, ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’, ‘सलाम’ यांसारख्या चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. ज्योती चांदेकर यांच्या पश्चात अभिनेत्री तेजस्विनी पंडितसह दोन मुली आहेत.