
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रारूप प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि.22) सायंकाळी उशीरा मान्यता दिली. त्यानंतर महापालिकेने 32 प्रभागाच्या प्रारूप रचनेचे नकाशे महापालिकेच्या www. pcmcindia.gov. in या संकेतस्थळावर रात्री प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
प्रभाग रचना मागील फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीप्रमाणेचे आहेत. उद्या शनिवारी (दि.23) महापालिका भवनातील पार्किंगच्या आवारात नागरिकांना प्रभागाचे सर्व नकाशे पाहता येणार आहेत. त्यावर 4 सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना देण्याची मुदत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचना मंजुर होऊन त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार महापालिकेची निवडणूक घेण्यात येत आहेत. फेब-ुवारी 2017 नंतर आता महापालिकेची निवडणूक होत आहे. महापालिका 12 मार्च 2022 पासून बरखास्त आहे. आयुक्त हे प्रशासक म्हणून 13 मार्च 2022 पासून महापालिकेचे कामकाज पाहत आहेत.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या पथकाने प्रभाग रचना तयार केली आहे. शहराची सन 2011 ची जनगणना विचार घेऊन प्रत्येक प्रभागातील मतदार संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रगणक गट (ब्लॉक) जुळवून प्रभाग नकाशे बनविण्यात आले आहेत. त्यासाठी गुगल अर्थ मॅपचा आधार घेण्यात आला आहे.
आयुक्त शेखर सिंह यांच्या स्वाक्षरीनंतर प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे राज्य शासनाच्या नगर विभाग विभागाकडे 5 ऑगस्टला सादर करण्यात आले. त्यानंतर नकाशे राज्य निवडणूक आयोगासमोर शुक्रवारी (दि.22) सादर करण्यात आले. आयोगाने शुक्रवार (दि. 22) सायंकाळी उशीरा प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता दिली आहे. त्यानंतर रात्री महापालिका प्रशासनाने प्रारुप प्रभाग रचना महापालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
पिंपरी येथील महापालिका भवनातील पार्किंगच्या आवारात उद्या शनिवारी (दि.23) प्रत्येक प्रभागाचे नकाशे लावण्यात येणार आहेत. ते नकाशे व समाविष्ट भागांची माहिती नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. तसेच, वृत्तपत्रात जाहिरात प्रकटनही प्रसिद्ध केले जाणार आहे.
चार सप्टेंबरपर्यंत हरकती स्वीकारणार
प्रारुप प्रभाग रचनेवर 4 सप्टेंबरपर्यंत सूचना व हरकती दाखल करण्याची मुदत आहे. हरकती व सूचना महापालिका भवनातील तळमजल्यावरील निवडणूक विभागात स्वीकारण्यात येणार आहेत. त्यावर 5 ते 12 सप्टेंबर या कालावधीत सुनावणी घेतली जाणार आहे. महापालिका आयुक्त 13 ते 15 सप्टेंबरपर्यंत प्रभागरचना अंतिम करुन नगर विकास विभागास सादर करणार आहे.
त्यानंतर प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे 16 ते 22 सप्टेंबर या कालावधीत पाठविली जाईल. राज्य निवडणूक आयोगाकडून 3 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत प्रभागरचनाला अंतिम मंजुरी मिळणार आहे. त्यानंतर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता असून, प्रत्यक्ष निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.
प्रभागनिहाय मतदार यादी तयार करणार
पिंपरी-चिंचवड शहराची सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 17 लाख 29 हजार 359 आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागात किमान 49 हजार आणि कमाल 59 हजार मतदारांचा समावेश असणार आहे. त्यानंतर 15 वर्षांत लोकसंख्येत तसेच, मतदार संख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरात 17 लाख 29 हजार 359 मतदार आहेत.
त्यामुळे प्रत्येक प्रभागात मतदार संख्या वाढणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय एक जुलै 2025 ची मतदार यादी महापालिका निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार त्या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाकडून मागविण्यात आल्या आहेत. त्या मतदार याद्या प्रभागनिहाय फोडून 32 मतदार याद्या तयार केल्या जाणार आहेत.
वेळापत्रकानुसार महापालिकेकडून कामकाज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेवर 4 सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहे. त्यावर सुनावणी होऊन, प्रभाग रचना अंतिम केली जाईल. ती प्रभाग रचना अंतिम मान्यतेसाठी राज्याच्या नगर विकास विभागानंतर राज्य निवडणूक विभागाकडे पाठविले जाईल, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
आजपासून महापालिका भवनात नकाशे लावणार
महापालिका भवनाच्या आवारात उद्या शनिवार (दि.23) पासून प्रारुप प्रभाग रचनेचे नकाशे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रभागात समाविष्ट भागांची माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रभाग रचना कशी असेल, ते नागरिकांना समजणार आहे, असे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.