
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी -रवि राठोड
पालघर : (सफाळा) आगामी गणेशोत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि पारंपरिक वातावरणात साजरा व्हावा यासाठी सफाळा पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीस गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, डीजे मालक, मूर्ती विक्रेते, मोहल्ला कमिटी सदस्य, पोलीस पाटील तसेच महिला दक्षता समिती सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत एसडीपीओ पालघर, वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएसईबीचे अधिकारी सहभागी झाले. गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी कायदा व सुव्यवस्थेबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी नागरिकांना “गणेशोत्सव पारंपरिक वातावरणात शांततेत आणि सुरक्षिततेत साजरा करा” असे आवाहन केले.
सूचनांमध्ये वाहतुकीस अडथळा न आणता मंडप उभारणे, मूर्ती सुरक्षेसाठी स्वयंसेवक नेमणे, फ्लेक्स–बॅनरसाठी परवानगी घेणे, आक्षेपार्ह देखावे टाळणे, महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व स्वयंसेवक नेमणे, वर्गणीसाठी दमदाटी न करणे, दोनच स्पीकरचा वापर, प्रथमोपचार व फायर फायटिंगची सोय, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाळणे आणि विसर्जन मिरवणुकीत मद्यपानास सक्त मनाई या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता.