
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी -रवि राठोड
पालघर (बोईसर) सिडको बायपासवर शनिवारी केवळ दोन तासांत पाच दुचाकी अपघातांची मालिका घडली. नव्याने टाकलेल्या काँक्रीट रस्त्यावर झालेला घसरटपणा व चिखलामुळे वाहनस्वार घसरून पडले. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी आठ ते नऊ जण जखमी झाले आहेत.
नागरिकांनी या दुर्घटनांसाठी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाला आणि निष्काळजीपणाला जबाबदार धरत प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे. “रस्त्याची देखभाल न केल्याने आणि चिखल साफ न केल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आहे,” असा आरोप स्थानिकांनी केला.
अपघातांचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून संतप्त ग्रामस्थांनी संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.