
पुण्यातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झालेला तरुण अखेर सापडला आहे. मित्रांसोबत सिंहगडला फिरायला आलेला गौतम गायकवाड सापडल्याची माहिती गडावर असलेल्या स्थानिकांनी दिली आहे. मागील ४ ते ५ दिवसांपासून गौतम बेपत्ता झाला होता.
सिंहगड किल्ल्यावर मित्रांसोबत फिरायला आलेला गौतम गायकवाड तानाजी कड्यावरुन खोल दरीत कोसळून बेपत्ता झाला होता. बुधवारी २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी गौतम गायकवाड बेपत्ता झाला होता. आता पाच दिवसांनंतर रविवारी (२४ ऑगस्ट) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास गौतमचा शोध लागला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तानाजी कड्याजवळ स्थानिक नागरिक त्याला घेऊन गडावरील वाहनतळाच्या दिशेने निघाले असून याबाबत खात्रीसाठी पथक पाठवण्यात आले आहे, अशी माहिती हवेली पोलिसांनी दिली आहे.
सिंहगड किल्ल्याच्या तानाजी कडा येथील हवा पॉइंटजवळ गौतमचा पाय घसरला. तो थेट खोल दरीत कोसळला. मागील ५ दिवसांपासून तो बेपत्ता होता. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास तो मित्रांच्यासोबत सिंहगडवर आला होता. लघवीला जाऊन असे मित्रांना सांगून गेला होता. पण बराच वेळ होऊनही गौतम परत न आल्याने मित्र त्याला शोधायला गेले.
शोध सुरु झाल्यावर मित्रांना गौतम कुठेच दिसला नाही. हवा पॉइटजवळ त्याची चप्पल सापडली. अंदाज न आल्याने तो खाली कोसळला. त्यानंतर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामीण पोलीस दाखल झाले. २४ वर्षीय गौतम गायकवाड हा हैदराबादहून त्याच्या ५ मित्रासह पुण्याला फिरायला आला होता. सिंहगडावर फिरताना तो दरीत कोसळला.