
राम मंदिर निकालाविरोधात होऊ शकते याचिका !
माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नुकतेच अयोध्येतील राम मंदिराबाबत मोठं विधान केले होते. त्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे.
मुळात तिथे बाबरी मशिदीची निर्मितीच अपवित्र होती. असे एका मुलाखतीत चंद्रचूड म्हणाले होते. त्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या असून त्यांच्या या विधानाला आधार बनवत सुप्रीम कोर्टाच्या राम मंदिराच्या निकालाविरोधा क्यूरेटिव्ह याचिका दाखल केली जाऊ शकते, असा मतप्रवाहही आता सुरू झाला आहे.
राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे माजी संचालक प्रोफेसर मोहन जी. गोपाल यांनी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या विधानानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘लाइव्ह लॉ’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, चंद्रचडू यांचे विधान म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या 2019 च्या निकालाच्या विपरीत आहे. मशीद निर्माण करण्यासाठी मंदिर नष्ट केल्याचा कोणताही पुरावा मिळाला नव्हता, असे निकालात म्हटले आहे.
राम मंदिराबाबतचा निकाल तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाने दिला होता. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर मंदिर बांधण्याची परवानगी हिंदू पक्षकारांना या निकालातून देण्यात आली होती. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनीच या निकालाचे लेखन केल्याची चर्चा त्यावेळी होती.
चंद्रचूड यांच्या विधानावर प्रो. गोपाल म्हणाले, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणारे निकाल देण्याची न्यायालयाची जबाबदारी असते. निकाल आपल्या बाजूने न लागलेल्या लोकांनाही न्याय झाल्याचे दिसायला हवे. अयोध्येचा निकाल चुकीचा होता, हे माझे वैयक्तिक मत आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला एकत्रितपणे क्यूरेटिव्ह याचिका दाखल करायला हवी का, हा प्रश्न आहे. कदाचित असे करावे लागेल.
कालीकत विद्यापीठात बोलत असताना प्रो. गोपाल यांनी हे विधान केले आहे. आता अयोध्येचा निकाल दूषित झाला आहे. निकाल आणि नंतर केलेल्या टिप्पणीमधील विसंगतीमुळे निकालावरील विश्वार कमकुवत होऊ शकतो. या विधानाच्या आधारावर क्यूरेटिव्ह याचिका दाखल केली जाऊ शकते. सुप्रीम कोर्टाच्या निकालातील गंभीर न्यायिक त्रुटी सुधारण्यासाठीचा हा एक दुर्मिळ कायदेशीर उपाय असल्याचेही गोपाल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आपल्या विधानाबाबत यापूर्वीच खुलासा केला आहे. आपले शब्द संदर्भापासून वेगळे करत चुकीच्या पध्दतीने मांडण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाचा अयोध्येचा निकाल आस्थेवर नव्हे तर साक्ष आणि कायदेशीर सिध्दांताच्या आधारावर होता. टीकाकार नेहमी पूर्ण निकाल वाचत नाही. हा निकाल एक हजारांहून अधिक पानांचा आहे, असा खुलासा त्यांनी केला होता.