
निवडणूक जिंकून देणाऱ्या ‘या’ बड्या नेत्यांच्या हाती सूत्रे !
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष बडे इच्छुक गळाला लावण्याचे प्रयत्न करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबरोबच काँग्रेस पक्षाने विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी Teachers and Graduates constituencies काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समन्वयकांची नियुक्ती केली आहे. सर्वच ज्येष्ठ नेत्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, निवडणुका होणाऱ्या सर्वच मतदारसंघात काँग्रेसने समन्वयकांची जबाबदारी दिली आहे, त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार की काँग्रेस पक्षाने स्वबळाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. थोरात हे यापूर्वी प्रदेशाध्यक्ष होते, त्यांच्याकडे उत्तम संघटक म्हणून पाहिले जाते. मात्र, महाविकास आघाडीत पुणे पदवीधरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते. या मतदारसंघातून अरुण लाड हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यामुळे महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ही जागा सोडणार का, हा खरा प्रश्न आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील तरुण नेते तथा विधान परिषदेचे गटनेते माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे नागपूर पदवीधर मतदार संघाच्या समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणुका जिंकण्यामध्ये सतेज पाटील यांचा हातखंडा आहे. मागील निवडणुकीत पुणे शिक्षक मतदारसंघाची अवघड जागा काँग्रेस पक्षाला जिंकून दिली होती.
पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना निवडणून आणण्यासाठी सतेज पाटलांनी दिल्लीपर्यंत सूत्रे हलवली होती. थेट दिल्लीत हायकमांडपर्यंत पोचून आसगावकर यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती. तसेच महाविकास आघाडीतील बड्या नेत्याला अंगावर घेतले होते.
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या समन्वयक पदाची जबाबदारी माजी मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे. सुनील देशमुख हे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात अर्थराज्य मंत्री होते. विदर्भातील अमरावती विभागाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आता त्यांच्यावर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही जागाही मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती.
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या समन्वयकपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष एम. एम. शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी कसलेल्या पहिलवानांच्या हाती सूत्रे देण्यात आलेली आहेत.