
कोंढवे धावडे येथील हाॅटेलमध्ये किरकोळ वादातून कामगाराने हाॅटेल मालकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. पीकॉक फॅमिली गार्डन बार अँड लॉजिंग येथे मंगळवारी (दि. 26) रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
संतोष सुंदर शेट्टी (वय ४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी कामगार उमेश दिलीप गिरी (वय ३९, रा. कात्रज) याला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कामगाराने आपल्या मालकाचा चाकूने भोसकून खून केल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.
याबाबत बोलताना पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, आरोपी कामगार गिरी हा मागील एक महिन्यापासून शेट्टी यांच्याकडे काम करत होता. शेट्टी यांनी पीकॉक गार्डन अँड रेस्टॉरंट हे हॉटेल भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतले आहे. गिरी हा दारू पिऊन कामावर येत होता. तसेच तो काम देखील व्यवस्थित करत नसे. त्यावरून शेट्टी त्याला रागावत असत.
मंगळवारी रात्री देखील कामगार गिरी आणि शेट्टी या दोघात किरकोळ वाद झाला, त्यावेळी गिरी याने किचनमधील चाकूने शेट्टी यांच्या मानेवर वार केला. वार वर्मी लागल्यामुळे शेट्टी यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, प्रसंगावधान राखत तेथील काही कामगारांनी गिरी याला पकडून ठेवले. त्यानंतर उत्तमनगर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. त्यानुसार उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी कामगाराला ताब्यात घेतले.