
सरकार पाडलेल्या ‘त्या’ बंडावरुन माजी मुख्यमंत्र्यांचे खळबळजनक दावे…
काँग्रेसच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये मोठा संघर्ष पेटला आहे. मध्य प्रदेशमधील सरकार पाडण्यावरुन काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांच्यात सुरू असलेल्या दावे-प्रतिदाव्यांवरुन काँग्रेससह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी 2020 मध्ये मध्य प्रदेशातील काँग्रेस पक्षाचं सरकार पडण्याचा दोष कमलनाथ यांच्यावर टाकल्यानंतर मोठं राजकारण तापलं आहे. आता तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही आता सिंह यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी कमलनाथ यांनी ज्योतिरादित्य शिंदेंच्या ग्वाल्हेर-चंबळच्या मागण्या वेळेवर पूर्ण केल्या नाहीत, त्यामुळे ते संतापले आणि काँग्रेस सरकार अल्पमतात आले, असा आरोप केला होता. याचवेळी त्यांनी माझा आणि माधवराव शिंदे किंवा ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी कोणताही वाद नव्हता असंही स्पष्ट केले होते.
यावर कमलनाथ यांनीही करारा जवाब देताना म्हणाले, ज्योतिरादित्य शिंदे यांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि “दिग्विजय सरकार चालवत आहेत” या धारणा ही सरकार पडण्याची खरी कारणे होती. आता या दोन्ही नेत्यांच्या खळबळजनक दाव्यांमुळे मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
दिल्लीत पक्षाध्यक्ष खर्गे आणि राहुल गांधी यांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना पक्ष, लोकशाही आणि संविधान वाचवण्याची आणि लढण्याची शपथ घेतल्यावर हा वाद चव्हाट्यावर आला. दोन्ही नेत्यांच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा मध्य प्रदेशच्या राजकारणावर परिणाम होत आहे आणि आगामी काळात पक्षात नवा राजकीय भूकंप निर्माण करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
मध्य प्रदेश काँग्रेसमधील नेतृत्वातील गटबाजी, अविश्वास आणि कमकुवतपणाचे लक्षण आहे. येत्या काही महिन्यांत, हा राजकीय तणाव संपूर्ण राज्याला आश्चर्यचकित करू शकतो आणि आगामी निवडणूक रणनीतींवरही परिणाम करू शकतो.
मध्य प्रदेशात आधीच अडचणीत आलेल्या काँग्रेस पक्षाला दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांच्यातील हा वाद नक्कीच परवडणारा नाही. राजस्थानमधील अशोक गेहलोत आणि सचिन पायलट वादामुळे सत्ता गमावलेल्या काँग्रेसची आता मध्य प्रदेशातील सिंह आणि कमलनाथ यांच्यातील वाद डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.