
मनोज जरांगे पाटील यांनी गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठी आता आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, यासाठी जरांगे पाटील यांंनी आजपासून (ता.29ऑगस्ट) मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अनेक आमदार-खासदार हजेरी लावताना दिसत आहेत. मामा-भाचे आमदार असलेले अभिजीत पाटील, कैलास पाटील, तसेच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्टेजवर जाऊन जरांगेंच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शविला आहे.
दरम्यान, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी कालच (गुरुवारी, ता. 28 ऑगस्ट) पंढरपूरहून मुंबईकडे प्रस्थान ठेवले होते. मुंबईकडे निघताना त्यांनी मराठा आरक्षणासाठी महायुती सरकारने एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावावे अशी मागणी केली होती. तसेच, जरांगेंच्या आंदोलनात सहभगी होण्यासाठी कार्यकर्त्यांसमवेत निघाले होते.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील (Kailash Patil), आमदार अभिजीत पाटील यांनी आज दुपारी आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आंदोलक जरांगे पाटील यांच्याशी स्टेजवर जाऊन चर्चा केली. या आमदार अभिजीत पाटील-आमदार कैलास पाटील या मामा भाच्यांनी आपला पाठिंबा मराठा आरक्षणासाठी जाहीर केला आहे.
या आमदार खासदारांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी दहा ते पंधरा मिनिटे चर्चा केली. विशेषतः आमदार अभिजीत पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर हे जरांगे पाटील यांच्याशी दीर्घकाळ चर्चा करताना दिसून आले. आमदार अभिजीत पाटील यांनी पंढरपूर आणि माढ्यातून आलेल्या लोकांबाबतही जरांगे पाटील यांना स्टेजवर सांगितले.
यातील आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असून अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडीत, आमदार प्रकाश सोळंके यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. ओबीसींचं काढून त्यांना देता येणार नाही’ असे म्हटले आहे. त्यावर कैलास पाटील म्हणाले, यापूर्वी सरकारने मराठ्यांना नवी मुंबईत आरक्षणासंदर्भात जो शब्द दिला होता, त्या शब्दाचं काय झालं. असा माझा सरकारमधील लोकांना सवाल आहे.
मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं, काय द्यायचं हे सरकारने ठरवावे. मी माझ्या आरक्षणाच्या मतावर ठाम आहे. आंदोलनाची मुदत जरी आज सायंकाळी सहापर्यंतची असली तरी मी जागा सोडणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला सांगितले आहे. मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, मराठ्यांना अन्न, पाणी मिळू नये यासाठी पोलिसांकडून दबाव टाकून हॉटेल बंद केले जात आहेत. पण, तो उद्देश कधीच सफल होणार नाही, असेही कैलास पाटील यांनी सांगितले.
अभिजीत पाटील यांनीही एकनाथ शिंदेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मागच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मनोज जरांगे पाटील यांना शब्द देण्यात आला. तो शब्द पूर्ण करण्यात यावा. ते काय ठरलं होतं, ते महाराष्ट्राच्या पुढं आलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांना निवडणुकीच्या अगोदर काय शब्द दिला होता, तो पूर्ण करण्यात यावा.