
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर अखेर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जीआर काढला आहे, मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आता ओबीसी समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे, ओबीसी समाजाकडून सरकारच्या या निर्णयाला विरोध होत आहे.
ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या गॅझेटवर प्रतिक्रिया देताना मोठं भाकीत केलं आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
वेगवेगळ्या संघटना आहेत ते त्यांच्या पद्धतीनं त्यांचं मत प्रदर्शित करत आहेत. मी ही माझ्या पद्धतीनं जाणार आहे, समता परिषद ही आपल्या पद्धतीनेच जात आहे. हैदराबाद गॅझेटचा जीआर आहे, त्याची शब्दरचना ओबीसीसाठी अडचणीची ठरणार आहे. खरं -खोटं काय आहे? ते बघायला पाहिजे, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांची मराठा एकच जात आहे, मात्र ओबीसीच्या 374 जाती आहेत, सगळ्यांचं मत एकच आहे आरक्षणाला धक्का लगता कामा नाही. गावागावात आंदोलनं तर होतच आहेत, पण आता संपूर्ण ओबीसी समाज आंदोलनात उतरेल, असा इशाराही यावेळी भुजबळ यांनी दिला आहे
यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आता सगळं त्यांचचं राज्य आहे. त्यांनी महाराष्ट्राला विकत घेतलं आहे. कोर्टात नक्की जाणार, सध्या सुट्टी आहे, असं वकील बोलले, पण एक-दोन दिवसांत आम्ही नक्की कोर्टात जाऊ, तो जीआर मला दाखवला नाही, असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.
ओबीसी समाजाची बैठक
दरम्यान दुसरीकडे आज मुंबईतल्या वाय बी चव्हाण सेंटर येथे या सर्व पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली. सकल ओबीसी संघटना यांच्याकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मराठा समाजाला ओबीसीमधून मिळत असलेल्या आरक्षणाचा यावेळी विरोध करण्यात आला. सरकारने काढलेल्या जीआरवर देखील या बैठकीत चर्चा झाली. सरकारने काढलेल्या जी आरच्या विरोधात न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई कशी लढायची याबाबत कृती आराखडा तयार करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.