
मनोज जरांगे पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमधून पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या टीकेला अप्रत्यक्षरित्या उत्तर दिलं.
याचबरोबर त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर देखील अप्रत्यक्ष टीका केली.
मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले. ‘इतकी तरफड सुरू आहे. मराठ्यांनो हुशार व्हा याचा अर्थ समजून घ्या. हा पक्का जीआर आहे.’ या वक्तव्यानं जरांगे यांनी जीआरबाबत असलेला संभ्रमाबाबत देखील मत व्यक्त केलं.
तसंच पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे यांनी अप्रत्यक्षरित्या छगन भुजबळांच्या नाराजीचा देखील समाचार घेतला. ते नाव न घेता म्हणाले, ‘जर येवल्याचं ऐकून जर काही इकडं तिकडं केलं तर गाठ माझ्याशी आहे.’
मनोज जरांगे पाटील यांनी ओबेसी नेते लक्ष्मण हाकेंबद्दल देखील उत्तर दिलं. ते म्हणाले, ‘मी त्याच्यावर बोलत नाही. मी त्याला मोजत देखील नाही. मराठ्यांनो तुम्ही देखील त्याला मोजू नका. थोडे दिवस माझ्या म्हणण्यानुसार चला. इतकी तडफड सुरू आहे याचा अर्थ जीआर पक्का आहे.
दरम्यान, ओबेसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी वादग्रस्त शब्द वापरत मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाची मागणी करतात. मात्र ते शाहू फुले आंबेडकर यांचे फोटो लावत नाहीत असं वक्तव्य केलं होतं. याचबरोबर हाकेंनी बारामती येथील आंदोलनादरम्यान देखील जरांगेवर टीका केली होती.
ते म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेजवळ बसायचं आणि मुख्यमंत्र्यांना आईवरून शिवीगाळ करायची. अशा लोकांना सरकार रेड कार्पेट घालतं. महाराजांनी अठरा पगड जातींना घेऊन हे राज्य निर्माण केलं आणि हा म्हणतो राज्याचा सातबारा आमच्या नावावर आहे. एकूण काय तर शासनाच्या जीआर नंतर ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत.