
राज्यातील विधिमंडळांच्या दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेतेपद रिक्त आहे. त्यामुळे मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अमीन पटेल यांनी सोमवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा केली. त्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ग्रीन सिग्नल मिळताच काँग्रेसने लगेचच पुढचा डाव टाकला आहे. सतेज पाटलांसाठी मुंबईत वायुवेगाने हालचाली सुरु असून काँग्रेस नेत्यांनी लगेचच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे सुरु असलेल्या या चर्चेला दुजोरा मिळाला आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीची मुदत ३१ ऑगस्टला संपली. त्यामुळे आता हे पद रिक्त झाले आहे. त्यामुळे आता राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. या पदासाठी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत (Shivsena) रस्सीखेच पाहावयास मिळत होती. मात्र, सोमवारी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अमीन पटेल यांनी सोमवारी दुपारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.
विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या 78 आहे. त्यापैकी सत्ताधारी महायुतीचे 40 सदस्य आहेत तर विरोधक असलेल्या महाविकास आघाडीकडे 16 सदस्य आहेत. तर सध्या 22 जागा रिक्त आहेत. विधानपरिषदेतील संख्याबळ पाहता महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा सदस्य आहेत तर काँग्रेसकडे (Congress) सात सदस्य आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य आहेत.
महाविकास आघाडीतील फॉर्म्युल्यानुसार विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला येणार असून त्यामुळे काँग्रेसने विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला. विधानपरिषदेतील संख्याबळ पाहता महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा सदस्य आहेत तर काँग्रेसकडे सात सदस्य आहेत. या संख्याबळानुसारच काँग्रेसने या पदावर दावा केला असून त्याला बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ग्रीन सिग्नल दर्शवला.
सोमवारी दुपारी उद्धव ठाकरे यांच्याकडील बैठक संपल्यानंतर लगेचच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व विजय वडेट्टीवार यांनी लगेचच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या रिक्त विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा केली असल्याचे समजते.
त्यामुळे आता येत्या काळात लवकरच विधानपरिषदेला विरोधी पक्षनेता मिळण्याची चर्चा सुरु झाली आहे. या पदासाठी काँग्रेसकडून माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नाव आघाडीवर आहे. त्यामुळे या पदावर काँग्रेसने दावा केला असल्याचे समजते. त्यामुळे येत्या काळात सतेज पाटलांच्या निवडीने लवकरच काँग्रेसला लाल दिवा मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे.