
ट्रम्प यांना झुगारून अमेरिकन कंपनीने HALला दिले खास इंजिन !
भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध गेल्या काही महिन्यांपासून बिघडलेले आहेत. ५० टक्के टॅरिफ प्रकरणामुळे तर ते अधिकच चिघळले. दरम्यान, अशातच ट्रम्प यांच्या धोरणांना झुगारून अमेरिकन कंपनी ‘जनरल इलेक्ट्रिक’ (GE) ने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ला तिसरे F-404 एव्हिएशन इंजिन दिले आहे.
हे इंजिन भारताच्या स्वदेशी बनावटीच्या LCA-तेजस मार्क-१A लढाऊ विमानांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात अमेरिकेकडून एकही इंजिन पुरवले गेले नव्हते, त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये काहीशी कटुता निर्माण झाल्याचे दिसत होते. परंतु, भारताच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीने रणनीती आखली जात आहे, त्यावरुन तरी अमेरिकेचा अहंकार आता कमी होऊ लागला आहे.
विलंब आणि नाराजी
भारत आणि अमेरिकेमध्ये झालेल्या करारानुसार, GE कंपनीला HAL ला ९९ F-404 इंजिनांचा पुरवठा करायचा आहे. यापैकी १२ इंजिन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मिळणार आहेत.
मात्र, अमेरिकेकडून या इंजिनांचा पुरवठा जवळपास दोन वर्षांनी उशिराने होत आहे. आतापर्यंत फक्त तीन इंजिनेच भारतात आली आहेत. या विलंबाबद्दल हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.
..यामुळे पुरवठा रोखण्याची शक्यता!
अमेरिकेने या विलंबाचे कारण जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय असल्याचे सांगितले असले, तरी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या हत्येचा कट आणि अलीकडील ‘टॅरिफ वॉर’ सारख्या मुद्द्यांमुळे हा पुरवठा मुद्दामहून संथ गतीने केला जात असल्याची चर्चा आहे.
राजकीय भूमिकेत बदल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यानंतर (३१ ऑगस्ट-१ सप्टेंबर), अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेत अचानक बदल झाल्याचे दिसून आले आहे.
ट्रम्प यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे कौतुक केले असून, यावर पंतप्रधान मोदींनी भारत आणि अमेरिका हे चांगले मित्र आणि नैसर्गिक भागीदार असल्याचे म्हटले आहे.
यापूर्वी, ऑपरेशन सिंदूरमध्ये मध्यस्थी नाकारल्यामुळे ट्रम्प यांनी भारताला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हटले होते आणि ५०% शुल्क लादले होते. मात्र, आता ट्रम्प यांना भारताच्या भूमिकेपुढे झुकावे लागल्याचे दिसत आहे, आणि त्यांनी मोदींना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.
भविष्यातील वाटचाल
२०२१ मध्ये, संरक्षण मंत्रालयाने HAL सोबत ८३ LCA मार्क-A साठी सुमारे ४८ हजार कोटी रुपयांचा करार केला होता. आता सरकारने हवाई दलासाठी अतिरिक्त ९७ स्वदेशी लढाऊ विमाने खरेदी करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे, भारताची संरक्षण क्षमता वाढेल, पण त्यासाठी अमेरिकेकडून इंजिनांचा वेळेवर पुरवठा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.