
भारताच्या विजयानंतर भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं…
पहलगाम हल्ल्यानंतर दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी (14 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ पहिल्यांदाच आशिय चषक 2025 स्पर्धेत आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तान संघाचा 7 विकेट्सने पराभव करत दणदणीत विजय मिळवला.
मात्र पहलगाम हल्ल्यामुळे या सामन्यावर बहिष्कार घालण्याची मागणी झाली होती. शिवसेना ठाकरे गटाकडून माझा कुंकू माझा देश अभियान राबवण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुंकू पाठवण्यात आले. याचपार्श्वभूमीवर आता भारताच्या विजयानंतर भाजपाने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपाचे नेते आणि महाराष्ट्रातील प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्ट करताना म्हटले की, काल पाकिस्तानला किक्रेटच्या मैदानात सर्व बाजूने चारी मुंड्या चीत करून विजयी होत, पाकिस्तान खेळाडूंची दखलही न घेता भारतीय संघ पुढे निघून गेला. ही खरी पहलगाम शहिदांना वाहिलेली श्रध्दांजली होती. हेच खरे अस्सल वाघ, असे म्हणत केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
केशव उपाध्ये म्हणाले की, पहलगामच्या दुर्दैवी घटनेनंतरही परदेशातील पर्यटनात रमलेले उद्धव ठाकरे किंवा पाकिस्तानची भाषा बोलणारे राहुल गांधी यांच्यासारखे भारतीय नेते म्हणजे कागदी वाघ! सतत पराभवाची कारणे शोधायची यांची सवय आहे. यांना लढायचं माहिती नाही आणि यांना विजयाची भाषा कधी कळली नाही. सैन्याने ॲापरेशन सिंदूर यशस्वी करीत पाकिस्तानला धडा शिकवलाच, पण आता क्रिकेटच्या मैदानावरही भारतीय संघाने हेच सिद्ध केले. यह नया भारत है, यह लडनेसे डरता नही है, लडता है और जीतता भी है, असे म्हणत केशव उपाध्ये यांनी भारतीय संघाचे देखील कौतुक केले आहे.
भारत आणि पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायेच झाले तर पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर साहिबजादा फरहानच्या 44 धावांच्या जोरावर पाकिस्तान संघाने 127 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 47 धावा केल्या. तर अभिषेक शर्माने 31 आणि तिलक वर्माने 33 धावा केल्या. यासह भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवत आपले उपांत्य फेरीचे तिकीट पक्के केले आहे. भारताचा आता आपला पुढील सामना 19 सप्टेंबर रोजी ओमान संघाविरुद्ध खेळणार आहे.