
मुंबई विद्यापीठाच्या २०२३-२४ आणि २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांतील उत्कृष्ट महाविद्यालय, आदर्श शिक्षक, प्राचार्य आदी विविध पुरस्कार केंद्रीय अल्पसंख्याक कार्य व संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले.
स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन सर्व पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र – कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्कृष्ट शोधनिबंध प्रकाशित करणाऱ्या वर्गवारीमध्ये विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागातील कार्यरत प्राध्यापकांना गौरविण्यात आले. यामध्ये डॉ. अहमद अली, डॉ. प्रवीण वाळके, डॉ. अनिल राघव, डॉ. नवीनचंद्र शिंपी, डॉ. प्रदीप सरवदे, डॉ. पुरव बदानी, प्रा. राजेश कांबळे, डॉ. सजीव चाको, डॉ. सुदेश मांजरे, डॉ. केयुरकुमार नायक, डॉ. अनुराधा गर्गे यांचा समावेश आहे.
२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात संशोधन प्रकल्प अनुदान मिळवणाऱ्या मान्यवरांमध्ये डॉ. प्रवीण वाळके, सुरेश मैंद, डॉ. विश्वनाथ पाटील, डॉ. पांडुरंग पाटील, आणि डॉ. स्मिता शुक्ला या प्राध्यापकांना गौरविण्यात आले. तसेच २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार शहरी विभागातून पनवेलमधील पिल्लई महाविद्यालय आणि ग्रामीण विभागातून डी. जी. तटकरे महाविद्यालय व रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाने पटकावला.
हेही वाचाआक्सा समुद्री पदपथ बेकायदेशीर; दोन महिन्यांत समुद्री पदपथ हटविण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश
तर २०२४ – २५ मधील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार शहरी विभागातून चेंबूरमधील महावीर एज्युकेशन ट्रस्टच्या शहा आणि अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि डोंबिवलीतील मॉडेल महाविद्यालयाने पटकावला. तर ग्रामीण विभागातून वेंगुर्ला येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय सर्वोत्कृष्ट ठरले.
तसेच आदर्श प्राचार्य पुरस्कार शैक्षणिक २०२३-२४ साठी शहरी विभागातून कल्याणमधील बी. के. बिर्ला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अविनाश पाटील आणि ग्रामीण विभागातून पालघरमधील सेंट जॉन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्चच्या प्राचार्य डॉ. सविता टॉरो यांना गौरविण्यात आले. तर २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शहरी विभागातून विवेकानंद एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्य डॉ. सुप्रिया शिधये आणि ग्रामीण विभागातून पालघरमधील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांना गौरविण्यात आले.
२०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील सर्वोत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार शहरी विभागातील एल. एस. रहेजा कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील रूपल कोरे, तर ग्रामीण विभागातील कणकवली महाविद्यालयातील संजय राणे यांना प्रदान करण्यात आला. तर २०२४-२५या शैक्षणिक वर्षात ग्रामीण विभागातून कुडाळमधील संत राऊळ महाराज महाविद्यालयातील संगम कदम यांना सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी मुंबई विद्यापीठ हे देशातील अग्रगण्य विद्यापीठ असून देशाच्या उभारणीत या विद्यापीठाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.