
दैनिक चालू वार्ता मोहोळ प्रतिनिधी-बापू घळके
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” शासनाच्या या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ बुधवार दि.१७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून होणार असून सोलापूर जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतीमध्ये या अभियानाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत किनगाव (ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे सकाळी १० वाजता या अभियानाचा शुभारंभ होणार आहे. सोलापूर जिल्हयातील सर्व खासदार,आमदार, जिल्हा व तालुकास्तरीय सर्व खाते प्रमुख हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील एका ग्रामपंचायतीस उपस्थित राहून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता अभियानाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांच्यादृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या अभियानात सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले आहे.
योजनेच्या शुभारंभाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रादेशिक विभाग, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत या चारही स्तरावर करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी सांगितले.
असा असेल नियोजित कार्यक्रम…
दि 17 सप्टेंबर रोजीच्या सर्व ग्रामसभांच्या ठिकाणी शुभारंभ कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी 08.45 ते सकाळी 9 वाजता ग्रामसभा होणार आहे. सकाळी 9 ते सकाळी 9.10 वाजता या अभियानाबाबत ग्रामस्थांना आवाहन करण्यात येणार आहे. सकाळी 09.10 ते सकाळी 09.40 या वेळेत प्रविण प्रशिक्षकांकडून अभियानाची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे, असेही उपमुख्य कार्यकारी सुर्यंकात भुजबळ यांनी सांगितले. सकाळी 09.40 ते सकाळी 10.00 या वेळेत उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन तर सकाळी 10.00 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मुख्यंमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या राज्यस्तरीय शुभारंभ होणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.