
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पक्षांतर वाढले आहे. अशातच विदर्भामध्ये बच्चू कडू यांन मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्याने बच्चू कडू यांची साथ सोडली आहे. या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता विदर्भात काँग्रेसची ताकद वाढली आहे.
प्रहारचे मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा रोहित पटेल यांनी पक्षाची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. राजकुमार पटेल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी साथ सोडल्यामुळे बच्चू कडू यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राजकुमार पटेल यांनी विविध पक्षातून पाचव्यांदा पक्षांतर केले आहे. आधी बसपा, भाजपा, राष्ट्रवादी त्यानंतर प्रहार संघटनेमध्ये असललेल्या राजकुमार पटेल यांनी आता काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. राजकुमार पटेल यांनी अमरावतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.
राजकुमार पटेल यांच्या काँग्रेसच्या पक्षप्रवेशाने मेळघाट मतदारसंघात काँग्रेसला बळकटी मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पक्षांतर करणारे राजकुमार पटेल हे पहिले व्यक्ती आहेत. २०२४ च्या निवडणुकीत राजकुमार पटेल यांनी प्रहारकडून निवडणूक लढवली होती. राजकुमार पटेल यांचा भाजपचे केवलराम काळे यांच्याकडून पराभव झाला होता. आतापर्यंत राजकुमार पटेल यांनी सात वेळा विधानसभा निवडणूक लढवली. यामध्ये ३ वेळा मेळघाटमधून ते आमदार झाले आहेत तर ४ वेळा त्यांचा पराभव झाला आहे.