
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७७ वा वर्धापन दिन उदगीर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात १७ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ९.०० वाजता राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले व स्वातंत्र्यवीर अमर हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
मराठवाडा मुक्ती संग्राम हा मराठवाड्यातील जनतेच्या त्याग, शौर्य आणि संघर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. या संग्रामाला स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांसारख्या थोर नेत्यांचे नेतृत्व लाभले. उदगीरमधील स्वातंत्र्यसेनानी आणि अमर हुतात्मा हावगीराव आप्पाराव पाटील यांच्या वारशाचीही यावेळी आठवण करण्यात आली. त्यांच्या नातवंडांपैकी श्रीकांत कल्याणराव पाटील यांचा उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे व तहसीलदार राम बोरगावकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी प्राणपणाने लढा दिला. त्या सर्व शूर क्रांतिवीरांच्या बलिदानाला शतशः नमन करण्यात आले.
या कार्यक्रमाला तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. तसेच मराठवाडा स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थित स्वातंत्र्य सैनिक व कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.
आजची तरुण पिढी या संघर्षातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्यरत राहील, हाच खरा मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीरांना अभिवादन ठरेल, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.