
‘या’ दोन शत्रू देशांसोबत मिळून चक्क…
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर तणाव वाढल्याचे बघायला मिळाले. मात्र, एकीकडे भारताला धमक्या आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केली.
त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले की, मी माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काही वेळ फोनवर संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. भारत आणि अमेरिकेचे संबंध मजबूत आहेत आणि राहतील. आता अमेरिकेच्या भूमीवर भारताच्या दोन दुश्मनांची भेट होणार आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख देखील याच महिन्यात अमेरिकेचा दाैरा करणार असून ते डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जातंय.
मागच्या वेळी ते अमेरिकेच्या दाैऱ्यावर असताना त्यांनी अमेरिकेच्या भूमीवरून थेट भारताला परमाणू हल्ल्याची धमकी दिली होती. त्यानंतर सर्वांनी याचा निषेध केला. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांना टार्गेट करत अमेरिकेतूनही टीका करण्यात आली. आता बांगलादेशच्या सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद यूनुस आणि पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांची भेट होणार आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे ही भेट इस्लामाबादमध्ये नाही तर अमेरिकेत होत आहे.
बांगलादेशच्या विदेश मंत्र्यांनी याबद्दलची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, यूनुस आणि शहबाज यांची भेट पुढच्या आठवड्यात न्यूयॉर्कमधील संमेलनात होणार आहे. शहबाज आणि यूनुस यांच्या भेटीमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पाकिस्तानने अगोदरच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर गुडघे टेकली आहेत. हेच नाही तर यूनुस देखील अमेरिकेच्या पुढे झुकल्याचे सांगितले जातंय.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या संमेलनात सहभागी होणार नसून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर होणार असल्याचे भारताकडून सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून मी नरेंद्र मोदी यांना भेटण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट म्हटले. यामुळे अजूनही संभ्रम आहे की, नरेंद्र मोदी या संमेलनात सहभागी होणार की परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर. मात्र, भारतावरील दबाव वाढवण्यासाठी अमेरिका पाकिस्तान आणि बांगलादेशलासोबत घेताना दिसत आहे.