
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून देगलूर तालुक्यात सरासरीच्या सुमारे ११० टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रस्ते खराब झाले आहेत. पूल खचले आहेत, काही ठिकाणी वाहून गेले आहेत. महापुरामुळे अनेकांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत, कुणाची जनावरे वाहून गेली, कुणाची दगावली आहेत, शहरातील नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी जाऊन नुकसान झाले आहेत. अनेक नागरिकांचे बळी गेले आहेत. यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून त्या उपाययोजना प्राधान्याने राबवाव्यात, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे , माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेठवार यांनी त्यांच्या संपर्क कार्यालय भक्तापूर रोड येथे दैनिक चालू वार्ता प्रतिनिधीशी संवाद साधला तेव्हा ते पुढे ते म्हणाले, यावर्षी मे महिन्यापासूनच पाऊस सुरू आहे. सुरुवातीपासून होत असलेले पाऊस नुकसानकारक आहेत. यामुळे अनेकांच्या शेतीसह घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे देगलूर तालुक्यातील नदी-नाल्यांना महापूर आले आहेत. पिके पाण्यात आहेत, अनेकांची पिके, जमिनी वाहून गेल्या आहेत. अति पावसामुळे रस्ते खराब झाले आहेत. अनेक रस्ते, पूल वाहून गेले आहेत. तालुक्यातील सोयाबीन या प्रमुख पिकासह सर्वच खरीप हातचे गेले आहेत. यामुळे सरकारने पंचनाम्याची वाट पाहत बसण्याची गरज नाही. पावसामुळे झालेले नुकसान ग्राह्य धरून सर्वच शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी. या पावसामुळे नदी व ओढ्यांच्या काठच्या जमिनी
खरडून गेल्या आहेत. अशा शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिपावसामुळे सर्वच पिके पाण्यात असल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे शहरी भागातही अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त नागरिकांनाही आर्थिक मदत मिळावी, घरे पडलेल्या, जनावरे दगावलेल्या पशुपालकांना व मृतांच्या नातेवाईकांना भरभरून आर्थिक मदत द्यावी, यावर्षीच्या पावसाने तालुक्यात सरासरी ओलांडली आहे. यामुळे देगलूर तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करून पंचनाम्यांची वाट न बघता सरसकट मदत करावी, अन्यथा काँग्रेस पक्ष नुकसानग्रस्तांना घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मोगलाजी शिरसेटवार यांनी दिला. त्यावेळी देगलूर तालुक्यातील अनेक काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
मेच्या नुकसानग्रस्तांना सप्टेंबरची ही भरपाई मिळावी
यावर्षी मे महिन्यातच अवकाळी पावसाने शेतीसह नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. शहरवासियांच्या घरांमध्ये पाणी जाऊन त्यांचेही नुकसान झाले होते. त्या नुकसानग्रस्तांना ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीला पात्र नसल्याचा शासन नियम बाजूला ठेऊन आता नुकसान झालेल्या सर्वांना मदत मिळवून दिल्या शिवाय काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही, आम्ही घराघरांत जाऊन नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे मोगलाजी शिसेटवार यांनी म्हणाले.