
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी-सुरेश ज्ञा. दवणे
जालना (मंठा )
मराठा समाजाचे हक्क, ओळख व इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या हैदराबाद गॅझेटमधील जुन्या मराठा, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा नोंदींच्या शोधकामाला वेग देण्यासाठी गावपातळीवर तसेच तालुकास्तरीय समित्या तातडीने स्थापन करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी मंठा तालुक्यातील अखंड मराठा बांधवांकडून तहसीलदार कार्यालयासमोर करण्यात आली आहे.
शासनाच्या आदेशानुसार या नोंदींचा शोध घेऊन संबंधितांना तातडीने उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना, अद्याप या संदर्भात ठोस हालचाल झालेली नाही. त्यामुळे समाजात प्रचंड नाराजी असून शासन व प्रशासनाविरोधात रोष वाढू लागला आहे.
मराठा समाजाचे म्हणणे आहे की गॅझेट नोंदींच्या आधारे मराठा समाजाच्या ऐतिहासिक व कायदेशीर हक्कांना मान्यता मिळू शकते.
नोंदींचा शोध विलंबित करून शासन समाजाची फसवणूक करीत आहे.
तातडीने गाव व तालुका पातळीवरील समित्या स्थापन करून जुनी नोंदवही, दस्तऐवज व पुरावे शोधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेणे गरजेचे आहे.
मराठा बांधवांचा इशारा
“जर शासन आदेश असूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर मराठा समाज शांत बसणार नाही. गावोगावी आंदोलन छेडून शासनाला जागे केले जाईल,” असा इशारा मराठा बांधवांनी दिला आहे.
दरम्यान, तहसीलदार साहेबांनी या संदर्भात तातडीने आदेश देऊन समित्या स्थापन कराव्यात, अशी ठाम मागणी पुन्हा करण्यात आली आहे. अन्यथा पुढील काळात आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, अशी स्पष्ट चेतावणी मंठा तालुक्यातील अखंड मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.