
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त असलेली शिवसेना शिंदे गटाने एक जाहिरात दिली होती. या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो जाहिरातीमध्ये लावण्यात आला होता.
यावरुन ठाकरे गटाने शिंदेंवर टीका केली होती. आनंद दिघे नेते, उपनेते नव्हते, ते फक्त जिल्हाप्रमुख होते.त्यांचा फोटो तुम्ही बाळासाहेबांच्या बरोबरीने का लावता? असा सवाल संजय राऊतांनी केला होता. बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा कट असल्याचा आरोपही ठाकरे गटाने केला होता. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी उत्तर देताना दिघेसाहेब खोट्या वृत्तीच्या लोकांना कळणार नाहीत, असे म्हटले होते. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राजन विचारेंनी त्याग केल्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आहेत. त्याबद्दल एकनाथ शिंदेंनी रोज राजन विचारेंचे पाय धुवून तीर्थ प्राशन केले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
राजन विचारेंचे पाय धुवून तीर्थ प्राशन केले पाहिजे
एकनाथ शिंदे आज जे काही आहेत ते राजन विचारेंच्या त्यागामुळे आहेत. राजन विचारेंनी त्याग केल्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आहेत. त्याबद्दल एकनाथ शिंदेंनी रोज राजन विचारेंचे पाय धुवून तीर्थ प्राशन केले पाहिजे. राजन विचारे सभागृह नेते होते. एकनाथ शिंदेंच्या घरी दुर्दैवाने दुर्घटना घडली. ते सैरभैर झाले होते. दु:खात होते. त्यांना दु:खातून बाहेर काढण्यासाठी राजन विचारे यांनी आनंद दिघे यांच्याकडे प्रस्ताव ठेवला की एकनाथ शिंदे आपला कार्यकर्ता आहे. त्याच्या घरी दुर्घटना घडली आहे. त्यांच्या दोन मुलांचे निधन झालं आहे. आपण त्यांना सभागृह नेते करुन त्यांना आपल्या कामात सहभागी करुन घेऊया. हा राजन विचारेंचा त्याग आहे. त्याला उद्धव ठाकरेंनी मान्यता दिली. हे असे प्रसंग आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
त्यांना आनंद दिघे काय माहिती
हे आम्हाला काय निष्ठेच्या गोष्टी सांगतात. त्यांची जे लफंगे पोर रस्त्यावर उतरली आहेत, त्यांना आनंद दिघे काय माहिती आहेत. त्यांना राजन विचारे, सतीश प्रधान, मु दा जोशी हे त्यांना माहिती आहेत का, असा सवाल संजय राऊतांनी केला.