
इगतपुरी प्रतिनिधी :- श्री. विकास पुणेकर
इगतपुरी :- हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग पिंप्री टोल प्लाझा इगतपुरी येथे कॉन्ट्रॅक्टर कंपनी अश्मी रोड कॅरिअर प्राइवेट लि. या कंपनीद्वारे दिनांक 23/03/2024 रोजी पासून इगतपुरी तालुक्यातील गोरगरीब कुटुंबातील तरुण टोल कर्मचारी म्हणुन काम करत आहेत. परंतु यांना सुरुवातीपासूनच तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत आहे, त्यामुळे टोल कर्मचाऱ्यांनी याआधी अनेक वेळा कॉन्ट्रॅक्टर कंपनी यांच्याकडे किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्यात यावा, मासिक वेतन वेळेवर मिळावे, पगार स्लीप मिळावी, कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा,कामावर असतांना कर्मचाऱ्यांना दुखापत अपघात झाल्यास सर्व खर्च कंपनी मार्फत केला जावा,योग्य वार्षिक बोनस मिळावा अश्या विविध मागण्या मांडल्या होत्या. पगारवाढीसाठी मागण्या, निदर्शन आंदोलन करून सुद्धा अत्यंत कमी प्रमाणात पगारवाढ करण्यात आली होती.
सदर मागण्यांसाठी संबंधीत कॉन्ट्रॅक्टर कंपनी अश्मी रोड कॅरिअर प्राइवेट लि. च्या जनरल मेनेजर यांना वेळोवेळी विनंती निवेदन दिले होते. तरीही मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष व टाळाटाळ केले जात आहे. तसेच प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. त्यामुळे सर्व टोल कर्मचाऱ्यांनी दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी काम बंद आंदोलन पुकारले होते. इगतपुरी पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यासाठी म्हणुन ३५ ते ४० टोल कर्मचारी आले होते. आलेल्या सर्व टोल कर्मचाऱ्यांनी इगतपुरी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सारिका आहिरराव मॅडम ,गोपनीय विभागाचे पोलिस अधिकारी विनोदजी गोसावी, निलेशजी देवराज आदींना त्यांच्या विविध मागण्या सांगितल्या व पोलिस निरीक्षक सारिका आहिरराव मॅडम यांना निवेदन दिले व संबंधीत कॉन्ट्रॅक्टर कंपनी अश्मी रोड कॅरिअर प्राइवेट लि.चे इगतपुरी विभागाचे मॅनेजर प्रवीणजी टापरे, जनरल मॅनेजर विनोदजी जीवतोडे यांच्याशी टोल कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेला सध्याचा मासिक पगार हा अत्यंत तुटपुंज्या पद्धतीने देण्यात येत असुन त्यांना मासिक पगार हा जास्तीत जास्त वाढवुन देण्यासाठी व योग्य पद्धतीने बोनस देण्यात यावा तसेच इतरही विविध मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यासाठी बैठक घेऊन चर्चा केली. कंपनीचे मॅनेजर प्रवीण टापरे यांनी आश्वासन देत काही प्रमाणात पगार वाढ करून किमान वेतन कायद्यानुसार पगारवाढ केलेली नाही.
तरीही बैठकीत पूर्ण करण्यात आलेल्या मागण्यांवरून व पोलिस प्रशासनाचे विनंतीवरून टोल कर्मचाऱ्यांनी त्यांचे काम बंद आंदोलन माघे घेत कामावर रुजू होणार असल्याचे सांगितले असुन इगतपुरी पंचायत समिती सदस्य नंदलालजी भागडे व समाजसेवक प्रशांतजी कडू यांनी टोल कर्मचारी यांच्या पगारवाढ व विविध मागण्या पूर्ण करण्याकरीता लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टर कंपनी अश्मी रोड कॅरिअर प्राइवेट लि. चे प्रशासनाकडे जास्तीत जास्त पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.