
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने नागपुरात आयोजित केलेल्या चिंतन शिबिरात अजित पवारांनी मागर्दर्शन केले. यावेळी त्यांनी शिबिराबद्दल तसेच पुढील वाटचालीबद्दल पक्षातील नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे तसेच कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन केले.
यावेळी ते म्हणाले की, समविचारी पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसची ओळख आहे. हे चिंतन शिबीर हे फक्त पालिका निवडणुकींसाठी नाही, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची विचारधारा, भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी हे शिबीर आहे. येत्या काळात काही धाडसी निर्णय घ्यायचे आहेत,” असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. हे शिबीर आपल्या पक्षाच्या पुढच्या पिढीसाठी असल्याचेदेखील त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले की, “हे चिंतन शिबीर नेहमीसारखे नसून थोड्या वेगळ्या स्वरूपाचे असणार आहे. यावेळी काही ग्रुप करून त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे चर्चा केली जाणार आहे. तुमच्या मनामध्ये धाडसी कल्पना असू शकतात, त्याचा विचार करण्यात येईल. राज्यातील चांद्यापासून बांद्यापर्यंत भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. विदर्भातील काही प्रश्न वेगळे, मराठवाड्यातील वेगळे, पश्चिम महाराष्ट्रातील वेगळे तर कोकणमधील वेगळे प्रश्न्त आहेत. असे सगळ्या वेगवेगळा भागात आपल्याला काही ठोस निर्णय घ्यायचे आहेत. आपण जो आराखडा तयार करू, त्यावर आपण आपण नागपूर डिक्लेरेशन म्हणून अभिमानाने मांडणार आहोत.” अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
कोणतीही संघटना ही फक्त वरच्या पातळीवरच मजबूत नाही, तर ती तळागाळातून बांधली जाते. प्रत्येक नेत्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी काही ठराविक प्रकारचे संवादाचे मुद्दे लोकांसमोर ठेवले पाहिजेत.” असे अजित पवारांनी ठामपणे सांगितले. “प्रत्येक रात्री झोपायच्या आधी मी स्वतःला एक प्रश्न विचारतो, की आज मी किती लोकांच्या आयुष्यात बदल घडवला? हाच माझा यशाचा मापदंड आहे आणि हाच माझ्या राजकारणामध्ये असण्याचा हेतू आहे. सार्वजनिक जीवनामध्ये आपण सगळेजण काम करत असताना किती लोकांचे प्रश्न मार्गी लावले? हे महत्त्वाचे, असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.