
होणार जगातील सर्वात मोठी डील !
अमेरिका तैवानला 400 मिलियन डॉलरची मदत करणार होती, मात्र आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला हा निर्णय बदलला आहे. त्यांनी तैवानला मदत करण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर आता चीनसोबत एक नवी मोठी डील करण्याचा प्रयत्न ट्रम्प यांच्याकडून सुरू आहे.
वॉशिंग्टन पोस्टने सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं की, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प यांना एक मोठी डील करायची आहे. यातूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युटर्न घेतल्याचं दिसून येत आहे. या डीलच्या माध्यमातून ते चीनसोबत अमेरिकेचे संबंध सामन्य आणि तणाव रहित ठेवू इच्छित आहेत.
दरम्यान ही बातमी अशावेळी समोर आली आहे, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या राष्ट्रपतींशी फोनवरून संवाद साधणार आहेत. मात्र याबाबत बोलताना व्हाइट हाउसच्या प्रतिनिधीने म्हटलं आहे की, तैवानला मदत करायची की नाही, याबाबत अजून निश्चित असा निर्णय घेण्यात आलेला नाही.त्यावर आम्ही पुन्हा विचार करू शकतो.
अमेरिकन मीडियाने दिलेल्या माहितीनुसार डोनाड्र ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यामध्ये यावेळी टिकटॉकच्या संदर्भात एक मोठी डील (Tik Tok Deal) होण्याची शक्यता आहे. या डीननुसार अमेरिकेत टिकटॉकवरील बंदी उठवली जाऊ शकते. राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचं कारण देत अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्रपती जो बायडन यांनी टीक टॉकवर बंदी घातली होती, आता ट्रम्प ही बंदी उठवण्याच्या तयारीमध्ये आहेत. दरम्यान आमची डील जवळपास झाली आहे, सर्व ठरलं आहे, मी आता लवकरच चीनच्या राष्ट्रपतींशी बोलणार आहे, अशी माहिती देखील ट्र्प यांनी यावेळी अमेरिकन प्रसारमाध्यमांना दिली होती.
चीनकडून तैवानला पुन्हा धमकी
दरम्यान चीनकडून पुन्हा एकदा तैवानला धमकी देण्यात आली आहे, तैवान आम्ही आमच्या ताब्यात घेऊ असं चीनच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे. आपल्या सैन्य दलाला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे, 1949 साली तैवान चीनमधून वेगळं झालं आहे, तेव्हापासूनच चीन आणि तैवानमध्ये संघर्ष सुरू आहे.