
वांगचुक अटकप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांचे आरोप…
पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असली, तरी त्यासंदर्भातील आदेश पत्र अजूनही तपास यंत्रणेने दिलेले नाही.
वांगचुक यांच्याविरोधात पुरावे नसल्याने या कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे, असा आरोप ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण व सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक केल्यानंतर पाच दिवसांत आदेश पत्र द्यावे लागते पण, तेही देण्यात आलेले नाही. त्यामुळे न्यायालयीन लढाई लढण्यात केंद्र सरकार अडथळे आणत असल्याचा मुद्दा भूषण यांनी अधोरेखित केला. वांगचुक यांना ताब्यात घेऊन भाजप व केंद्र सरकारचीच बदनामी झाली आहे. गेली सहा वर्षे त्यांनी शांततेने आंदोलन केले असताना त्यांचे आंदोलन आत्ताच कसे हिंसक झाले, असा प्रश्न भूषण यांनी विचारला.
योगेंद्र यादव यांनी देशांच्या सीमांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, “देशाच्या सीमेलगतच्या प्रदेशांमध्ये अशांतता निर्माण होत आहे, ही बाब गंभीर आहे. शेतकरी आंदोलनाच्या काळात पंजाब, त्यानंतर मणिपूर आता लडाखमध्येही हिंसाचार होत आहे. या परिस्थितीकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप योगेंद्र यादव यांनी केला.
वांगचुक अचानक राष्ट्रविरोधी कसे झाले? वांगचुक यांनी अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. ते कधीही मोदीविरोधी नव्हते. पाकिस्तानला ते भारतविरोधी राष्ट्रीय सुरक्षेवर बोलायला गेले नव्हते, ते तिथे अन्न सुरक्षेवर बोलले. त्या परिषदेतही त्यांनी मोदींच्या धोरणांचे कौतुक केले होते! – योगेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्ते
जाणीवपूर्वक त्रास
सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली अंगमो यांनी पत्रकार परिषदेत वांगचुक यांच्यावरील आरोप फेटाळले. त्या म्हणाल्या की, गेल्या चार वर्षांपासून सोनम यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. जर लडाखमध्ये पाकिस्तानी नागरिक असतील, तर त्याची जबाबदारी वांगचुक यांची कशी, यासाठी गृह मंत्रालय जबाबदार आहे, असे सडेतोड प्रत्युत्तर गीतांजली यांनी दिले.
आरोप असा आहे की सोनमने पाकिस्तानमध्ये एक परिषद घेतली. मला विचारायचे आहे की त्यात काय चूक आहे? फेब्रुवारीमध्ये संयुक्त राष्ट्रांनी ही परिषद आयोजित केली होती. आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदूकुश पर्वतरांग चीन, पाकिस्तान, नेपाळ आणि भूतानसह आठ देशांना स्पर्श करते. विषय त्याच्याशी निगडित असेल तर या परिषदेत सहभागी होण्यात काहीही चूक नाही. – गीतांजली अंगमो, सोनम वांगचुक यांची पत्नी
‘केडीए’चा ‘एलएबी’ला पाठिंबा
नवी दिल्ली : सोनम वांगचुक यांची सुटका झाल्याशिवाय केंद्र सरकारबरोबर चर्चेमध्ये सहभागी होणार नाही असे ‘कारगिल डेमोक्रॅटिक पक्षा’ने (केडीए) या मंगळवारी जाहीर केले. केंद्राबरोबरची चर्चा थांबवण्याच्या ‘लेह शिखर संघटने’च्या (एलएबी) निर्णयाला केडीएने पाठिंबा दिला. दरम्यान, लडाखमध्ये मंगळवारी सात तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली. मात्र, सुरक्षा व्यवस्था कायम आहे.