
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर विजयची पहिली प्रतिक्रिया !
तमिळ अभिनेता विजय याच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ या पक्षातर्फे करूर जिल्ह्यात शनिवारी काढण्यात आलेल्या रॅलीत चेंगराचेंगरीमुळे ४१ लोकांचे प्राण गेले.
या घटनेनंतर तमिळनाडूसह देशभरात खळबळ उडाली. राज्य सरकारने विजयच्या पक्षाच्या जिल्ह्याध्यक्षांना अटक केली आहे. यानंतर आता दोन दिवसांनी अभिनेता विजयने व्हिडीओ संदेश प्रसिद्ध करून आपली बाजू मांडली आहे. तसेच मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यावर टीका केली आहे.
अभिनेता विजयने रॅलीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच या घटनेमागील सत्य लवकरच बाहेर येईल, असेही त्याने म्हटले आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे नेते एमके स्टॅलिन यांचा उल्लेख करत विजयने म्हटले की, तुम्हाला जर सूड उगवायचा असेल तर तुम्ही तो माझ्यावर उगवा. पण माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना हात लावू नका.
एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विजय म्हणाला, माझ्या आयुष्यात मी अशा प्रकारची वेदनादायक परिस्थिती कधीही पाहिली नव्हती. ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. माझ्यावरील विश्वास आणि प्रेमापोटी तिथे एवढ्या प्रमाणात लोक जमले होते. मी पोलीस विभागाला विनंती करेन की, त्यांनी सुरक्षा यंत्रणेत झालेल्या हलगर्जीपणाची चौकशी करावी. या दुःखद घटनेमुळे माझ्या मनाला अतीव वेदना झाल्या आहेत.
शनिवारी चेंगराचेंगरी झाल्यानंतर अभिनेता विजय करूरच्या घटनास्थळावरून निघून गेला होता. यावर बोलताना तो म्हणाला की, मी सुद्धा एक माणूस आहे. तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात लोक बाधित झाले होते, त्यामुळे मी तिथे पुन्हा गेलो नाही. कारण माझ्यामुळे पुन्हा गर्दी होऊ नये आणि बाधितांच्या मदतीत अडथळा येऊ नये, अशी माझी अपेक्षा होती.
माझ्या पक्षाने निष्काळीपणा दाखवलेला नाही
विजयने त्याच्या पक्षावर करण्यात आलेले हलगर्जीपणाचे आरोप फेटाळून लावले. ‘आम्ही कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. पण तरीही आमचे नेते, मित्र आणि सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री सर, जर तुम्हाला सूड घ्यायचा असेल तर माझ्याविरोधात कारवाई करा. मी घरी किंवा माझ्या कार्यालयातच आहे. या आणि माझ्याबरोबर जे करायचे ते करा’, असे अभिनेता विजयने म्हटले.