
पुणे शहरातील कोथरुड भागातील कुख्यात गँगस्टार निलेश घायवळनं लंडनला पळून गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे.ही बाब पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आली होती. पण आता घायवळला लंडन गाठण्यात जरी यश आलं असलं तरी दुसरीकडे पुणे पोलिसांनी एकापाठोपाठ एक असे दणके निलेश घायवळला देण्यास सुरुवात केली आहे.
पुणे पोलिसांनी कोथरुडमधील गोळीबार प्रकरणी निलेश घायवळ कनेक्शन समोर आल्यानंतर त्याच्याभोवतीचा कारवाईचा फास चांगलाच आवळण्यास सुरुवात केली आहे. दुचाकी,चारचाकी वाहनं जप्त करताना पोलिसांनी घायवळच्या गँगमधील काही साथीदारांना बेड्या ठोकल्या होत्या. या कारवाईनंतरच निलेश घायवळ थेट लंडनला पळून गेल्याचं समोर आलं. यानंतर आता पुणे पोलिसांनी त्याच्या मालमत्तेवरही टाच आणताना त्याची 10 बँक खाती गोठवली आहेत.
पुणे पोलिसांनी 10 बँक खाती गोठवत केलेली कारवाई हा निलेश घायवळसाठी मोठा धक्का मानला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पुणे पोलिसांनी या गोठवण्यात आलेल्या बँक खात्यातून तब्बल 38 लाख रुपये जप्त केले आहेत. पोलिस व आर्थिक गुन्हे शाखेकडून घायवळवर ही कारवाई करण्यात आली आहे.
गुंड निलेश घायवळने लंडन गाठण्यासाठी पासपोर्ट मिळवताना बनावट नावासह पत्त्याबाबतही फसवणूक केल्याची धक्कादायक बाब पुणे पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांसह अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसांभोवतीही संशयाचं धुकं दाटलं आहे.
अहिल्यानगर पोलिसांचा “Not Available” रिमार्क असून देखील निलेश घायवळ याला पासपोर्ट मंजूर झाल्याचे यामुळे समोर येत आहे. त्यामुळे कोणीतरी राजकीय शक्ती त्यासाठी काम करते आहे का? अशा चर्चांना आता बळ येऊ लागले आहे.अहिल्यानगर तसेच मराठवाड्यातील निलेश घायवळ याचे राजकीय कनेक्शन आहेत.मध्यंतरी अहिल्यानगरमधील एका मोठ्या यात्रेत राज्यातील मोठ्या राजकीय व्यक्तीबरोबर निलेश घायवळ सहभागी झाला होता. त्यामुळे ही यात्रा, त्याचे राजकीय कनेक्शन चर्चेत आले होते.
दरम्यान,पुण्यातील एका प्रकरणात उच्च न्यायालयाने त्याचा पासपोर्ट जमा करण्याचा आदेश दिला होता. तरी देखी त्याने तो जमा केलेला नाही.त्यामुळे त्याच्याविरोधात उच्च न्यायालयाचा अवमान केला म्हणून पुणे पोलिसांकडून कारवाईची तयारी करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.निलेश घायवळ याने पासपोर्ट कसा मिळवला,हा पोलिसांच्या तपासाचा अन् संशोधनाचा विषय बनला आहे.पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात कुठेतरी पाणी मुरले असल्याची शंका पोलिस व्यक्त करू लागले आहेत.
गुंड निलेश घायवळ यानं तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर वर दिलेल्या प्रक्रियेप्रमाणं १६ जानेवारी 2020 रोजी पासपोर्ट मंजूर झाला होता. या अर्जात त्यानं आपलं आडनाव घायवळ असं न लिहिता गायवळ असं लिहिलं होतं. तसंच त्यानं अहिल्यानगरच्या माळीवाडा भागातील पत्ता दिला होता. या ठिकाणी तो भाड्यानं राहत असल्याचं त्यानं अर्जात नमूद केलं होतं, त्यासाठी त्यानं भाडेकराराची प्रतही सादर केली होती.