
प्रांजल खेवलकर प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट…
मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या खराडी भागामध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता, या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे, खेवलकर प्रकरणात या फॉरेन्सिक अहवालामुळे मोठं ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्सचं सेवन केलं नसल्याचं या अहवालातून स्पष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे.
खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेलवकर आणि इतर सहा जणांना अटक करण्यात आली होती, आणि अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले होते. काही दिवसांपूर्वी हे फॉरेन्सिकचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाले आहेत, आणि त्या रिपोर्टमध्ये कोणत्याही आरोपींनी ड्रग्सचं सेवन केलं नसल्याची माहिती समोर आली आहे. आणि तेच रिपोर्ट आता पोलिसांनी चार्जसीटमध्ये देखील दिलेले आहेत, तेच रिपोर्ट आता न्यायालयात देखील सादर करण्यात आले आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया
मी आधीचपासूनच सांगत होतो. खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्सचं सेवन केलेलं नाहीये, सात जणांची रेव्ह पार्टी होऊ शकत नाही. त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना गुन्हे दाखल आहेत, असं दाखवण्यात आलं. शेवटी पोलीस म्हणाले ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, या सगळ्या गोष्टी पाहाता हा एक रचलेला कट आहे, असं वाटतं, असं खडसे यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटलं आहे. दरम्यान तुमचा रोख कोणावर आहे, असा प्रश्नही यावेळी एकनाथ खडसे यांना विचारण्यात आला, यावर बोलणं त्यांनी टाळलं, मला काहीही सांगायची गरज नाही, जनतेला सर्व माहीत आहे, असं खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच आता या प्रकरणात काही राहिलं नाही, आम्ही न्यायालयात लढू असं खडसे यांनी म्हटलं आहे.