
गुरुवारी (ता. 2 ऑक्टोबर) राज्यभरात दसरा सणाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. पण दसऱ्याला आता राजकीय रंग चढू लागला आहे. कारण दसऱ्यानिमित्त राज्यात पाच ठिकाणी राजकीय मेळावे होणार आहेत.
पण या पाचपैकी राज्याचे लक्ष हे मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कावर होणाऱ्या ठाकरेंच्या मेळाव्याकडे आणि गोरेगावातील नेस्को येथे होणाऱ्या शिंदेंच्या दसरा मेळाव्याकडे लागले आहे. पण याच मुद्द्यावरून आता शिवसेना शिंदे गटाकडून दोन दिवसांपूर्वी दसरा मेळाव्याचा जो टीझर रिलीज करण्यात आला आहे, त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊतांनी शिंदेंना गांडूळ म्हणत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (ता. 1 ऑक्टोबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शिंदे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये एकनाथ शिंदे भगव्या शालीत दिसून येत आहे, याबाबतचा राऊतांना प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, ते स्वत:ला बाळासाहेब ठाकरेच समजायला लागले आहेत. पण बाळासाहेब सामान्यांचे, बहुजन समाजाचे, मराठी माणसाचे पुढारी होते. बाळासाहेबांनी दिल्लीच्या चरणी आपला पक्ष, आपल्या भूमिका कधी अर्पण केल्या नव्हत्या. बाळासाहेब ठाकरे हे निर्णय कोणते घ्यावे यासाठी अमित शहा, मोदी यांच्या दारात जाऊन उभे राहत नव्हते. शिंदेंचा गट पावसाळ्यातील गांडुळासारखा आहे. मोदी-शहा राजकारणातून जातील तेव्हा हे गांडुळाप्रमाणे नष्ट होतील. तोपर्यंत त्यांना दसरा, गुढीपाडवा साजरा करू द्या. जोपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीच्या चरणी थैल्या अर्पण करताहेत, तोपर्यंत त्यांचा पक्ष राहील, अशी जहरी टीका राऊतांनी केली आहे.
तसेच, आमचा पक्ष बाळासाहेबांच्या विचारांवर चालतो असा दावा करणाऱ्यांबाबत राऊत म्हणाले की, बाळासाहेबांचा विचार त्यांना माहिती असता तर दिल्लीची बुटचाटेगिरी केली नसती, महाराष्ट्रात जे मराठी माणसाचे अध:पतन चालले आहे त्याकडे लक्ष दिले असते. मुंबई, महाराष्ट्रात बिल्डर, ठेकेदारांचे राज्य आणले नसते. शहा-मोदींची जी हुजुरी केली नसती. बाळासाहेबांचे नाव घेण्याची त्यांची कुवत नाही. कुवत ही मनाची, मेंदुची असते. मनाची कुवत यासाठी नाही की ईडी, सीबीआयला घाबरून यांनी पक्षांतर केले आणि मेंदुची कुवत यासाठी नाही की त्यांना बाळासाहेब, शिवसेनेचा विचार कधी समजून घेतला नाही. त्यामुळे उद्याचा जो मेळावा होणार तिथे फक्त पैशाचा धूर निघणार, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.