
शरद पवारांचं नाव घेतलं; ठाकरेंना दिलं आव्हान…
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह मातोश्रीत ठेवण्यात आला होता, असे धक्कादायक विधान कदम यांनी केले होते. शुक्रवारी त्यांनी पुन्हा एकदा आपण त्यावर ठाम असल्याचे सांगत नार्को टेस्टचे खुले आव्हान उद्धव ठाकरेंना दिले.
रामदास कदम यांच्या दसरा मेळाव्यातील विधानानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांकडून त्यांच्यावर पलटवार करण्यात आला. त्यानंतर कदम यांनी पत्रकार परिषदेत घेत पुन्हा एकदा ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, बाळासाहेब माझे दैवत आहेत. उद्धव ठाकरेंच्यात हिंमत असेल तर माझ्यासमोर येऊन मी जे बोललो नाकारावे. मग मी उत्तर देतो.
उद्धव ठाकरे कपटी आहेत. दोन दिवस बाळासाहेबांच्या मृतदेहाचा छळ त्यांनी केला. आमच्या दोघांची नार्को टेस्ट होऊन जाऊ द्या, असे आव्हान कदम यांनी दिले. मी उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवण्यास सांगितले होते. त्यावर हाताचे ठसे घेतल्याने त्यांनीच मला सांगितल्याचा दावा रामदास कदम यांनी केला.
उद्धव ठाकरेंनी यावर थेट बोलावे, त्यांना उत्तर देण्याची माझी तयारी आहे. मातोश्रीमध्ये दोन दिवस कुणालाच एन्ट्री नव्हती. उद्धव ठाकरे वाघाचे कातडे पांघारलेले लांडगा आहेत. म्हणून काल मी ओघाओघांत बोलून गेलो. ठरवून बोललो नाही. माझ्या नादाला लागू नका, मी जेव्हा बोलेन तेव्हा मातोश्री कापेल, हादरा बसेल, असे इशाराही कदम यांनी दिला.
मी बाळासाहेबांसोबत निष्ठेने दिवस काढलेत. त्यांच्याविषयी जर दोन दिवस असे घडले असेल तर ते खूप गंभीर गोष्ट आहे. मी जे बोललोय, त्यावर मी ठाम आहे. बदलणार नाही. तेव्हा शरद पवारही आले होते, त्यांनाही वर पाठविले नाही. त्यावेळी त्यांचे शब्द असे होते की, ‘अरे मिलिंद, का त्यांच्या बॉडीला त्रास देतोय उद्धव.’ मी त्यावेळी तिथेच होतो, असे रामदास कदम यांनी सांगितले.
उशिरा का होईना पण महाराष्ट्राच्या जनतेले कळू दे. माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत. पण मी बोलणार नाही. वेळ पडली तर सोडणारही नाही. जे बोललोय ते वास्तव आहे. मुलाच्या डोक्यावर हात घेऊन सांगावे, बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतलेत की नाही. इतरांनी यावर बोलू नये. त्यांना मी घाबरत नाही. उद्धव ठाकरेंनी स्वत: बोलावे. ते नेमके काय आहेत, हे हळूहळू महाराष्ट्राला कळेल, असे हल्लाबोल कदम यांनी केला.