
बोलताना मर्यादा पाळावी – काँग्रेस
मनोज जरांगे यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली ती अत्यंत निषेधार्ह आहे. मराठा समाजाचे नेतृत्व करत असताना, ही भाषा सुसंस्कृत आणि समंजस असलेल्या मराठा समाजाला शोभणारी नाही, हे लक्षात घ्यावे.
मनोज जरांगे यांच्या भाषेने मराठा समाजाची अप्रतिष्ठा होत आहे. मराठा समाजाची ही भाषा नव्हे. त्यामुळे आरक्षणाचा लढा हा मनोज जरांगे यांनी खालच्या पातळीवर आणू नये, असे खडे बोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी जरांगे यांना सुनावले आहेत.
मनोज जरांगे यांनी राहुल गांधी व काँग्रेस पक्षावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सचिन सावंत म्हणाले की, मनोज जरांगे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल खालच्या दर्जाची भाषा वापरली असली तरी राहुल गांधी यांनीच जातीय जनगणनेसाठी रान पेटवले आहे आणि काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवली जाईल असेही ठणकावून सांगितले आहे. कोणत्याही जातीय संघर्षाशिवाय व कोणालाही न दुखावता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग, हा याच 50 टक्क्यांची मर्यादा हटवण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्धारातून सुकर होईल. काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून कोणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
पुढे ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष संविधान व संविधानिक मर्यादा मानतो. प्रत्येकाला राजकीय पक्षांवर व नेत्यांवर टिका करण्याचा अधिकार आहे आणि त्या टिकेला उत्तर देण्याचाही अधिकार आहे परंतु ही टिका संविधानिक चौकटीत, संस्कृतीच्या परिघात आणि सुसंस्कृतपणाच्या मर्यादेत असावी. मराठा समाजाच्या माय भगिनींनी आपल्या 58 विराट मूक मोर्चांनी देशाला आदर्श घालून दिला आहे. त्या आदर्शाची आठवण प्रत्येकाला असली पाहिजे. आरक्षणाचा लढा लढताना केवळ आरक्षण मिळवून देणे नव्हे तर समाजाला आदर्श घालून देणे ही जबाबदारीही नेत्यांची असते. समाजाची प्रतिमा वाईट होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. त्यातही सर्व मोर्चे आणि हा लढा यापूर्वी राजकीय नव्हता त्यामुळे माझ्यासहित काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला, पण आता मात्र मनोज जरांगे यांच्या वक्तव्यांना राजकीय वास येत आहे.
काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचा व सर्वांचा पक्ष आहे तो कोणत्याही विशिष्ट जाती धर्माचा नाही. कोणावरही अन्याय होता कामा नये हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. काँग्रेसच्या शब्दकोशात जुमलेबाजी, जनतेची फसवणूक, खोटे जीआर, गॅझेटच्या नावाने शब्दच्छल हे प्रकार नसतात. जे करायचे ते प्रामाणिकपणे जनसेवेसाठी आणि संविधानाच्या चौकटीत करण्याची धारणा आहे, असेही सचिन सावंत यांनी सांगितले.
विजय वडेट्टीवार म्हणतायत, मराठा आरक्षणासाठी जो जीआर केलाय तो रद्द करण्याची आमची मागणी आहे. त्याचं कोण ऐकतय बुगळ्याच त्या. दिल्लीत गांधी लाल्याने सांगितलं असेल, मराठ्यांच्या विरोधात बोल म्हणून. म्हणून काँग्रेस मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलतेय. ओबीसींचा नेता कोणी नाही. ते जास्त बोलतात म्हणून मुख्यमंत्र्यांनी बोलवून घेतलं. मुख्यमंत्र्यांना यांची औकात कळली आहे. हे ओबीसींचे नेते होऊ शकत नाही, हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलय. त्यामुळे बापाची पेंड आहे का? जीआर रद्द करणं. हैदराबाद गॅझेटच्या आधारे जीआर काढलाय. आमची पण मागणी आहे, 1994 चा जीआर रद्द करा. वरच 2 टक्के आरक्षण ते पण रद्द करा. काहींनी असं सांगितलं की, आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो. म्हणून बंजारा समाजाच आरक्षण घेतलं, ते बंजारा समाजासारखे दिसत नाहीत. त्यांना बाहेर काढा. यापुढे जशाला तशी फाईट होणार.