
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातील खामला येथे असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात अचानकपणे जाऊन त्या ठिकाणची झाडाझडती घेतली आहे. यावेळी त्यांना एका अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये पैसे सापडल्याने खळबळ उडाली आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे बावनकुळेंची झाडाझडती सुरू असतानाच यावेळी त्या ठिकाणी प्रसार माध्यम सुद्धा उपस्थित होती. त्यामुळे अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये पैसे सापडल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींकडून बावनकुळेंवर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. पण या कार्यालयाची तक्रार आल्यानंतर मी या ठिकाणी झाडाझडती घेण्यासाठी आल्याचे यावेळी बावनकुळेंनी सांगितले. तर है पैसे या अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये कसे आले याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांना बोलवण्यात आल्याचे बावनकुळेंनी म्हटले.
नागपूरच्या प्रतापनगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (ता. 6 ऑक्टोबर) अचानक छापा टाकला. अनियमित पद्धतीने रजिस्ट्री केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. यावेळी बावनकुळेंना कार्यालयातील अधिकारी अतुल कपले यांच्या ड्रॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे आढळले. या पैशांबाबत बावनकुळे यांनी कपले यांना विचारणा केली. अनेक सहाय्यक दुय्यम निबंधकांकडून पैसे घेतल्याशिवाय रजिस्ट्री होत नसल्याच्या तक्रारी होत्या. ऑनलाइन प्रक्रिया असूनही एजंटमार्फत पैसे घेतले जात असल्याचे निदर्शनास आले. 30 लाखांवरील व्यवहारांची माहिती प्राप्तितर विभागाला न कळवल्याची अनियमितताही समोर आली. त्यामुळे याप्रकरणी बावनकुळे यांनी पोलिसांना बोलावून पैशांच्या स्त्रोताची चौकशी करण्याचे आदेश दिले.
तसेच, प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या माध्यमातून आवाहन करतो की, जर कोणत्याही रजिस्ट्रारने तुमच्याकडे पैसे मागितले तर अशा लोकांनी थेट माझ्या व्हॉट्सअपवर 904944040 या नंबरवर जर मला कळवले तर आम्ही कडक कारवाई करू. तर सर्व रजिस्ट्री ऑनलाइन शक्य असल्याने कोणालाही एक रुपयाही देण्याची गरज नाही. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी कोणती कारवाई करायची, याचा निर्णय पोलिसांच्या चौकशीनंतर घेण्यात येईल, असे बावनकुळेंकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. तर, यापूर्वी सावनेर आणि अमरावती येथेही त्यांनी असेच छापे टाकले होते. महाराष्ट्रात कुठेही भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराच यावेळी मंत्री बावनकुळेंकडून देण्यात आला आहे.