
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुंड निलेश घायवळ चर्चेत आहे. निलेश घायवळ सध्या लंडनला फरार झाला असून त्याने पुण्यातून पळून जाण्यासाठी बनावट नावाचा आणि बनावट पत्त्याचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे.
यानंतर आता निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ सुद्धा चर्चेत आला आहे. पुणे पोलिसांचा नकार असताना सुद्धा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने सचिन घायवळला शस्रपरवाना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी योगेश कदम यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी विरोधक त्यांच्यावर टीका करताना दिसत आहे. अशातच योगेश कदम यांच्या अडचणीत वाढणार आहेत. कारण शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सचिन घायवळ याच्यावरील गुन्ह्यांचे पुरावे दिले आहेत.
सुषमा अंधारे यांनी ट्वीट करताना म्हटले की, कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याच्या शस्त्र परवाना प्रकरणांमध्ये बुधवारी (08 ऑक्टोबर) गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, शस्रपरवाना देत असताना सचिन घायवळवर कुठलाही गुन्हा दाखल नव्हता. परंतु सचिन घायवळ याच्यावर फक्त खुनाचा गुन्हा नाही, तर मोक्का अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल होते. विशेष म्हणजे अशा व्यक्तीला शस्र परवाना दिला जाऊ नये, असा पोलिसांचा अहवाल होता. तरीसुद्धा योगेश कदम यांनी स्वतःच्या अधिकार कक्षेमध्ये हा विशेष परवाना देऊ केला. याचा अर्थ योगेश कदम यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत एका गुंडाला अभय देण्याचा आणि त्याला बळ पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे योगेश कदम यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी तत्काळ गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत सुषमा अंधारे यांनी सचिन घायवळ याच्यावरील गुन्ह्यांचे पुरावे दिले आहेत.
दरम्यान, निलेश घायवळ परदेशी पळून गेल्याने पोलीस संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यातच शस्त्रपरवान्याचे पत्र समोर आल्याने योगेश कदम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. योगेश कदम आणि निलेश घायवळचे काही कनेक्शन आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यातच आता निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्रपरवाना दिल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणी वाढ झाली आहे. याप्रकरणी स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटले की, सचिन घायवळवर कोणताही गुन्हा नाही हे पडताळून शस्त्र परवाना देण्यात आला आहे. त्यामुळे, संबंधित बातमीत तथ्य नाही, असे स्पष्टीकरण योगेश कदम यांनी दिले आहे.