
रोहित शर्माने कसोटी फॉर्मेटला रामराम ठोकल्यानंतर आपसूक कर्णधारपदाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर आली. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली. इंग्लंडला त्यांच्याच भूमीत 2-2 वर रोखलं.
त्यामुळे शुबमन गिलचं कसोटीतील कर्णधारपद पहिल्याच मालिकेत सिद्ध झालं. वेस्ट इंडिज विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही भारताने दणदणीत विजय मिळवला. असं असताना अचानक शुबमन गिलच्या खांद्यावर वनडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. संघात रोहित शर्मा असताना ही धुरा सोपवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. वनडे संघाचं कर्णधारपद मिळाल्यानंतर शुबमन गिल पहिल्यांदा पत्रकार परिषदेला सामोरं गेला. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वीची ही पत्रकार परिषद होती. पण त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार झाला आणि वनडे कर्णधारपदाबाबत विचारणा झाली. अखेर त्याने सत्य काय ते सांगून टाकलं. शुबमन गिलने सांगितलं की, अहमदाबाद कसोटी सामन्यादरम्यान वनडे कर्णधारपदाची घोषणा झाली. पण त्याला आधीच वनडे कर्णधारपदाबाबत माहिती होतं.
शुबमन गिलने मीडियाशी बोलताना सांगितलं की, ‘भले कसोटी सामना सुरु असताना घोषणा झाली असेल पण मला आधीच माहिती होतं. ही मोठी जबाबदारी आहे आणि सन्मान आहे. मी आपल्या देशाच्या वनडे फॉर्मेटला लीड करण्यासाठी तयार आहे. मागचे काही महिने रोमांचक राहिले आहेत आणि भविष्यासाठी तयार आहे.’ शुबमन गिलच्या या वक्तव्याने त्याला स्पष्ट माहिती होतं की रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर केलं जाणार आहे. म्हणजेच गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ते अजीत आगरकर आणि शुबमन गिल यांच्यात याबाबत चर्चा झाली होती.
रोहित शर्माची फलंदाज म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात रोहित शर्मा मैदानात उतरणार आहे. प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळेल यात काही शंका नाही. पण या मालिकेत फेल गेला तर पुढचं खूपच कठीण होईल. त्यामुळे वनडे वर्ल्डकप खेळण्याचं त्याचं स्वप्न धुळीस मिळू शकते. दुसरीकडे शुबमन गिलने सांगितलं की, टीम इंडियाला वनडे फॉर्मेटमध्ये विराट आणि रोहित शर्माची गरज आहे. आता दोघं जण आणखी किती वर्षे संघात जागा कायम ठेवतील हे सांगणं कठीण आहे. आता त्यांचा फॉर्मच क्रिकेटमधील भविष्य ठरवणार आहे.