
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर आणि पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीला पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांतील खासदार आणि आमदार उपस्थित होते, या बैठकीमध्ये राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत देखील चर्चा करण्यात आली.
दरम्यान या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ज्या तरुणांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही अशा तरुणांना एकूण जागांपैकी 50 टक्के जागांवर निवडणूक लढवण्याची संधी दिली जाणार आहे. जास्तीत जास्त तरुणांना संधी कशा प्रकारे देता येईल, ते बघा अशा सूचना या बैठकीत शरद पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आगामी काळात कशा प्रकारे युती करायची याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती देखील या बैठकीमध्ये देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे, यावर देखील या बैठकीमध्ये शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कधिकाळी एक आमदार आपल्या सोबत होता, पण तो आता काय वक्तव्य करत आहे हे सगळं माध्यमांवर येत आहे, त्यामुळे आपल्याला जातीय सलोखा बिघडवायचा नाही, जातीय सलोखा ठेवा, अशा सूचना या बैठकीमध्ये शरद पवार यांनी आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सरकारमधील काही नेते व मंत्री सध्या वादग्रस्त बोलत आहेत, मात्र आपण बोलताना प्रेमाची भाषा वापरा अशा सूचनाही यावेळी शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.